४९ कोटींची पाणीपुरवठा योजना लोकवर्गणीत अडकली
By admin | Published: June 16, 2015 12:28 AM2015-06-16T00:28:21+5:302015-06-16T00:28:21+5:30
शहरातील साडेआठ लाख लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने
३० टक्के वाटा कोण भरणार ? : महापालिकेने जबाबदारी झटकली
ंअमरावती : शहरातील साडेआठ लाख लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थानअंतर्गत ४९ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळविली आहे. मात्र, ३० टक्के लोकवर्गणीच्या वाट्यामुळे तूर्तास ती अडकली आहे. तिजोरीत ठणठणाट असल्याने महापालिकेने नकार दिला तर जीवन प्राधिकरण बोर्डाने अद्यापही मंजुरी प्रदान केली नसल्याने ही योजना अडकली असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
शहराचा वाढता विस्तार बघता ही योजना शहरवासींयासाठी अतिशय फलश्रूती ठरणारी आहे. ४४ कोटींची योजना वेळेत सुरु झाली नसल्याने ती आता ४९ कोटींवर पोहचली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे दौऱ्यावर असताना वाढीव पाणीपुरवठा योजेनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या निधीला मंजुरी प्रदान केली आहे. या योजनेसाठी लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम ही महापालिका प्रशासनाने अदा करावी, असे पत्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांच्या नावे पाठविले. परंतु महापालिका तिजोरीत ठणठणाट असल्याचे कारण पुढे करुन प्रशासनाने लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम मजीप्राने भरावी, असे कळविले आहे. त्यामुळे लोकवर्गणीचे १५ कोटी रुपये मजीप्राने भरण्याची हमी देखील घेतली आहे. जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची त्याकरिता मंजुरी आवश्यक असल्याने ती अद्यापही मिळाली नाही. (प्रतिनिधी)
नवीन योजनेत या कामांचा आहे समावेश
बडनेरा, भीमटेकडी, नागपुरी गेट व कॅम्प येथे नवीन जलकुंभाची निर्मिती
मोर्शीच्या सिंभोरा येथील सहा पंप बदलविणे
१९२ कि.मी. ची जुनी जलवाहिनी बदलविणे
नवीन नागरी वस्त्यांमध्ये १०० कि.मी.च्या जलवाहिन्या टाकणे
तपोवन येथे ३२ दशलक्ष लिटरचे नवे शुद्धिकरण केंद्र साकारणे