४९ शाळांतील विद्यार्थ्यांची होणार पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:36 AM2017-12-05T00:36:36+5:302017-12-05T00:36:55+5:30
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नजीकच्या गावातील शाळेसाठी आता तीन-चार किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे.
कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शासनाचे निर्देश आहेत. शून्य ते दहा पटसंख्येच्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन होणार आहे. पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता आली आहे. त्यामुळे गुणवत्ता असणाºया शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. कमी पटसंख्येमुळे बंद झालेल्या शाळेतील शिक्षकांची पदस्थापना ही समायोजित शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. त्या शाळांमध्येच त्या शिक्षकांचे वेतन काढले जाईल. परंतु, पहिली ते पाचवीच्या मुलांची यात पायपीट होणार आहे. शासनाच्या या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांबरोबर जिल्ह्यातील शिक्षकही अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. शिक्षकांची पदे रिक्त आहेतच. यामध्ये काहींचे समायोजन होतील. परंतु विद्यार्थ्यांना मात्र, पायपीट केल्याशिवाय पर्यायच नाही.
यादी गुलदस्त्यात ?
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ४९ शाळा बंद होणार असल्या तरी त्या नेमक्या कोणत्या, याची यादी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ४९ शाळा नजीकच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाºयांना दिले आहे. शासनाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.
- आर.डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)