पोलीस बंदोबस्तात एकाच दिवशी पकडले ४९१ वराह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:20 AM2017-12-14T00:20:19+5:302017-12-14T00:22:51+5:30
शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शहरात वाढलेली अस्वच्छता व आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पालिकेने वराह पकडण्याची मोहीम राबविली असून एकाच दिवशी तब्बल ४९१ वराह पकडून शहराबाहेर सोडण्यात आलीत.
दर्यापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणाचा कार्यक्र म राबविला आहे. या कार्यक्रमाला बुधवारी सकाळी ८ वाजता नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे व मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. शहर स्वच्छ राहवे यासाठी वराहांचा बंदोबस्त करण्यात येणार असून या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेचा विरोध वराह मालक करू शकतात, या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शहर स्वच्छ राहावे यासाठी वराह पकडो मोहीम चार ते पाच दिवस राबविण्यात येणार आहे. वराह पालकांनी वराहांना शहराच्या बाहेर सोडावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल.
- गीता वंजारी, मुख्याधिकारी
नगर परिषद, दर्यापूर