498 पुन्हा नवा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:01:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गाचा रोज नवा धमाका जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाकाळातील ११ महिन्यांतील सर्वाधिक ४९८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाचा रोज नवा धमाका जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाकाळातील ११ महिन्यांतील सर्वाधिक ४९८ पॉझिटिव्हचा हादरा बुधवारी बसल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २६,७२६ झाली आहे. २४ तासांत उपचारादरम्यान सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४४८ झाली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या १७ दिवसांत ४,७४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सलग तीन दिवसांत ४४९, ४८५ व ४९८ असे एकूण १४३० संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धमाका झालेला आहे.
‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत शासनाने सर्व क्षेत्रांत मोकळीक दिल्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढीस लागला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सध्या वाट लागली आहे. त्याचे पालन करविताना जिल्हा प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने केंद्र शासनाचे तीन सदस्यीय पथकाने जिल्ह्यास भेट देऊन सूचना केल्या होत्या तसेच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना जिल्हास्थिती अवगत केली होती.
राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी पुन्हा माजी आरोग्य संचालक तथा जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे डॉ. साळुंके व अन्य एक सल्लागार यांनी जिल्ह्यास भेट दिली. त्यांनी प्रथम सुपर स्पेशालिटीमध्ये बैठक घेतली व नंतर एक्झॉन हॉस्पिटल व आयसोलेशन दवाखान्याला भेट दिली. सायंकाळी जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.
- तर हॉटेल, बारला २५ हजार दंड, १० दिवस सील
हॉटेल, बार, रेस्टॉरेंटमध्ये क्षमतेच्या ५० टक्क्यांवर व्यक्ती आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन नसल्यास २५ हजारांचा दंड आकारून १० दिवसांकरिता प्रतिष्ठान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले.
५० पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंड
जिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन, हॉल , सभागृहांमध्ये आयोजित लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय चालक, मालक, व्यवस्थापकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन ५० हजारांचा दंड आकारणी करण्यात येईल. पुढील १० दिवसांसाठी मंगल कार्यालय सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.