महाराष्ट्रात पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट, गृह विभागाकडून अधिसूचना जारी
By जितेंद्र दखने | Published: October 6, 2024 05:33 PM2024-10-06T17:33:53+5:302024-10-06T17:34:21+5:30
पोलिस बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा
अमरावती : राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट दिली आहे. ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे. यामुळे पोलिस भरतीत आदिवासी तरुण-तरुणींना आता मोठा लाभ होणार होणार आहे.
राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गत काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी राजपत्र जारी केले असून त्यावर शासनाचे उपसचिव द. ह. कदम यांची स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१चा २२) याच्या कलम ५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, २०२४ संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलिस भरतीत देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आदिवासींना ५ सेंमीची सूट आहे; पण राज्यात ही सूट नव्हती. आता या निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांना खूप मोठा लाभ होणार आहे. राज्य शासनाने न्यायिक मागणी पूर्ण केली.
-डॉ. संदीप धुर्वे, आमदार, केळापूर-आर्णी मतदारसंघ