पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:46+5:302021-06-20T04:10:46+5:30
अमरावती/ संदीप मानकर पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये १० जूनच्या अहवालानुसार २६.४६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या आगमनामुळे ...
अमरावती/ संदीप मानकर
पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये १० जूनच्या अहवालानुसार २६.४६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या आगमनामुळे आठवड्याभरातच पाणीसाठ्यात ५.०३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सद्यस्थितीत ५११ प्रकल्पांमध्ये सरासरी ३१.४९ टक्के पाणीसाठा आहे. ही नागरिकांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.
यंदा पश्चिम विदर्भात १० जूननंतर मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे काही नद्यासुद्धा दुथडी भरून वाहिल्या. परिणामी उन्हाळ्यात घट झालेल्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात तरी वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदासुद्धा चांगला पाऊस बरसणार असून, प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
१९ जूनच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, १० जून रोजी नऊ मोठ्या प्रकल्पात ३२.२४ टक्के पाणीसाठा होता. आता त्यात वाढ होऊन तो ३७.१५ टक्के झाला. २५ मध्यम प्रकल्पांत ३०.३५ टक्के पाणीसाठा होता. आता ३६.७७ टक्के झाला. ४७७ लघू प्रकल्पांत १६.९५ टक्के पाणीसाठा होता. आता मात्र वाढ होऊन २१.०२ टक्के झाला आहे. ५११ सिंचन प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १०३१.४७ दलघमी आहे. त्याची सरासरी ३१.४१ टक्के आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने सध्या तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. प्रकल्प शंभर टक्के भरल्यास हजारो हेक्टरला सिंचनाचीसुद्धा सोय होणार आहे. सध्या नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३७.१५ टक्के, २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ३६.७७ टक्के, तर ४७७ लघु प्रकल्पांमध्ये २१.०२ टक्के पाणीसाठा आहे.
बॉक्स:
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ४४.६५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३५.८५ टक्के, अरुणावती २८.९५ टक्के, बेंबळा ५२.५१ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा प्रकल्प ३०.४० टक्के, वान ३३.७० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २८.७२ टक्के, पेनटाकळी २६.६१ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यतील तीन मध्यम प्रकल्पात ४८ टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे, तर यवतमाळ जिल्ह्यतील दोन प्रकल्पात ४७ टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये ४३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.