वरुडला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:57+5:302021-06-09T04:15:57+5:30
३० कोटी रुपयातून साकारणार सुसज्ज इमारत वरुड : तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, मार्च २०२० मध्ये ५० ...
३० कोटी रुपयातून साकारणार सुसज्ज इमारत
वरुड : तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, मार्च २०२० मध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्या कामाला आता सुरुवात झाली असून, आराखडा अंतिम टप्प्यात आहे. डॉ. सुधाकर बंदे यांनी तीन एकर जागासुद्धा दान दिल्याने उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला. ३० कोटी रुपये खर्च करून सुसज्ज इमारत साकारणार आहे .
वरुड तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वरुडला ग्रामीण रुग्णालय आहे. शहरापासून १२ किमी अंतरावर मध्य प्रदेश बैतूल जिल्हा सीमा आहे तर, छिंदवाडा जिल्ह्याची सीमा २२ किमीवर आहे. लगत नागपूर आणि वर्धा जिल्हा सीमा आहे. अडीच लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेला तालुका असून, अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयावर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असतो. याकरिता वरुडला उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी आ. देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. तर आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला. अखेर या पाठपुराव्याला २४ मार्च २०२० मध्ये यश येऊन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.