अपंग-सुदृढ विवाहितांना ५० हजारांचा आहेर
By Admin | Published: April 9, 2015 12:21 AM2015-04-09T00:21:40+5:302015-04-09T00:21:40+5:30
आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आंतर अपंग विवाहालाही राज्य सरकारमार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.
वर्षभरात ४५ प्रस्ताव : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर समाज कल्याणची योजना
अमरावती : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आंतर अपंग विवाहालाही राज्य सरकारमार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना सुरू असून त्याअंतर्गत जिल्ह्यातून ४५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात वधु-वरांपैकी १ अपंग व एक सुदृढ (अव्यंग) व्यक्ती आहेत.
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून असा विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यात वधू किंवा वर मागासवर्गीय असावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. या योजनेच्या धर्तीवर अपंग व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह करण्यास प्रेरणा मिळावी या हेतून शासनाने अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेत अपंग व्यक्तीशी अपंग नसलेल्या व्यक्तीने विवाह केला तर अशा जोडप्यालाही ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. अनुदानाची ही पद्धत आंतरजातीय विवाहप्रमाणेच आहे. अपंग व्यक्तीशी विवाह करण्यासाठी सुदृढ व्यक्ती लग्न करण्यास सहसा पुढे येत नाहीत. बहुतांश ठिकाणी अपंगासोबत अपंग व्यक्तीचा विवाह लावण्यात येतो. काही ठिकाणी अपंग नसलेल्या व्यक्ती अपंगांशी विवाह करतात. त्यांना प्रोत्साहन देणे व अपंग व्यक्तींना कौटुंबिक जीवन चांगल्याप्रकारे जगता यावे या हेतूने ही योजना राबविली जात आहे.
तरच मिळेल लाभ
योजनेच्या लाभासाठी वधू किंवा वर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असणे आवश्यक आहे. त्याच्या विवाहाची नोंदणी होणे बंधनकारक आहे. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत योजनेचा लाभ घेता येतो. याचा लाभ पहिल्यांदा विवाह करणाऱ्यांसोबत यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेल्यांना व दुसऱ्यांदा विवाह करणाऱ्या घटस्फोटीतांनाही मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
४५ प्रस्तावांना अद्याप अनुदान नाही
२५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य किंवा खरेदीसाठी ४ हजार ५०० रुपये व स्वागत समारंभासाठी ५०० रुपये देण्यात येतात. ४५ प्रस्तावांसाठी अद्यापही शासनाचे अनुदान मिळालेले नाहीत.
अपंगांमध्ये नाराजी
अपंगाने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यानंतर या अनुदानाचा लाभ मिळत नाही. मात्र समाजात अपंगांचा अपंगांशी संसार थाटला जातो. त्यामुळे अशा अपंग वधू व वर जोडप्यांसाठी या योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.
समाजकल्याण विभागाकडे नव्याने सुरू झालेल्या सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून आतापर्यंत ४५ प्रस्ताव प्राप्त झाले आहे.१ एप्रिलपासून ही योजना सुरू झाली. मात्र यासाठी अनुदान उपलब्ध झाले नाही. अनुदान उपलब्ध होताच पात्र लाभार्थ्यांना लाभ देऊ
- भाऊराव चव्हाण
समाज कल्याण अधिकारी
जिल्हा परिषद अमरावती.