कापूस खरेदीत ५० लाखांनी फसवणूक; अमरावतीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: February 12, 2023 08:35 PM2023-02-12T20:35:10+5:302023-02-12T20:36:18+5:30
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धारणी पोलीस ठाणे गाठले.
अमरावती: कापसाला अधिक भाव देण्याची बतावणी करून तीन व्यापाऱ्यांनी धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांची तब्बल ५०लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी रात्री मोहम्मद मोहसीन (२०), अर्जुन सानू पटोरकर (२५) व मोईन खान वसीम खान या तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बाजारात कापसाचा दर प्रतिक्विंटल ७५०० रुपयांच्या घरात असताना आरोपींनी धारणी येथील रामलाल कासदेकर व अन्य शेतकऱ्यांचा कापुस ९ ते १० हजार रुपयांनी घेण्याची लालूच दाखविली. अधिक दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस त्यांना दिला. आरोपींनी तब्बल ५० लाख रुपये किमतीचा सुमारे ५०० क्विंटल कापूस खरेदी केला. १३ जानेवारीपासून त्या आरोपी व्यापाऱ्यांनी तो गोरखधंदा चालविला. मात्र, पैसे देण्याची वेळ येताच हात वर केले. तथा आरोपी तेथून रफुचक्कर झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामलाल कासदेकर यांनी शनिवारी धारणी पोलीस ठाणे गाठले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"