दर्यापुरातून ५० लाखांचे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:11+5:302020-12-25T04:12:11+5:30
फोटो पी २४ दर्यापूर फोल्डर दर्यापूर : बनोसा स्थित राजदीप ज्वेलर्समधून ४० ते ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ...
फोटो पी २४ दर्यापूर फोल्डर
दर्यापूर : बनोसा स्थित राजदीप ज्वेलर्समधून ४० ते ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. यादरम्यान सोने असलेली बॅग चोरणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने याप्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याचे संकेत स्थानिक पोलिसांनी दिलेत. या घटनेच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली.
राजदीप ज्वेलर्सचे संचालक दीपक प्रांजळे हे गुरूवारी सकाळी १०.२० च्या सुमारास आपल्या दुकानात आले. त्यानंतर त्यांनी दुकानाची स्वच्छता केली. ती आटोपल्यानंतर झाडू कपाटाच्या मागे ठेवण्याकरता गेले असताना एका तरुण चोराने त्यांच्या दुकानात कपाटाजवळ ठेवलेली सोन्याची दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. सोने असलेली बॅग लंपास झाल्याचे कळताच त्यांनी दुकानाच्या बाहेर येऊन शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दीपक प्रांजळे यांच्या ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोराचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी रस्त्यालगत असलेल्या अन्य दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. त्यात क्रीम कलरचा शर्ट घातलेला, पायात काळ्या रंगाचे बूट असलेला अंदाजे २० वर्षे असलेला चोर मुलगा विश्वकर्मा ज्वेलर्सकडे पळत जाताना दिसत असल्याचे लक्षात आले. विश्वकर्मा ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तो मुलगा त्या ठिकाणाहून दुचाकीवर दोन व्यक्तींसोबत जाताना दिसत आहे.
दर्यापूर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पुढील तपाससासाठी स्थानिक गुन्हे शाखेला पाचारण केले. पुढील तपास अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांचे पथक करीत आहेत.
कोट
गुरुवारी सकाळी १०.२५ दरम्यान दुकान उघडल्यानंतर सफाई करीत असताना सोन्याची बॅग दुकानातील कपाटाजवळ ठेवली होती. कपाटामागे फडा ठेवण्याकरिता गेलो तोच चोराने बॅग लंपास केली. बॅगमध्ये एक किलोच्या जवळपास सोन्याचे दागिने होते.
- दीपक प्रांजळे, संचालक, राजदीप ज्वेलर्स
-----------
सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन यापूर्वीच सराफा दुकानदारांना केले होते. सदर घटनेचा तपास वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे. लवकरच चोराला गजाआड केले जाईल.
- तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती