अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० टक्के कपात
By admin | Published: November 13, 2016 12:09 AM2016-11-13T00:09:53+5:302016-11-13T00:09:53+5:30
अग्रीमाचे समायोजन टाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ती रक्कम वसूल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
एमएमसीचे निर्देश : अग्रीमाच्या समायोजनात गौडबंगाल
अमरावती : अग्रीमाचे समायोजन टाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ती रक्कम वसूल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील ५० पेक्षा अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून ५० टक्केच वेतन मिळणार आहे. अग्रीमाचे रक्कम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही ५० टक्के कपात केली जाणार आहे.
महापालिकेतील बहुतांश अधिकारी-कर्मचारी वेळेवरच्या खर्चासाठी काही रक्कम आगाऊ घेतात. तो कार्यक्रम किंवा अन्य कार्य पूर्ण केल्यानंतर या आगाऊ घेतलेल्या रकमेचा हिशेब देऊन ती रक्कम परत करणे अनिवार्य असते. मात्र महापालिकेतील ४० पेक्षा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८७ लाख रुपयांचे अग्रीम रकमेचे समायोजन केले नाही. यावर २०११-१२ लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आलेत. अतिरिक्त आयुक्तांचे लेखा विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी लेखा आक्षेपातील अग्रीम व वसुली पात्र रकमा वसूल करण्यासाठी मुख्य लेखाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्यानंतरही अग्रीमाचे समायोजन झालेले नाही. वसुलीपात्र रकमाही रखडल्या आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्तांनी मुख्यलेखाधिकाऱ्यांना पत्र लिहून अग्रीमाबाबत आठवण करून दिली आहे.
महापालिकेच्या कुठल्या खातेप्रमुख किंवा विभागप्रमुखांकडे किंवा त्यांच्या अधिनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कोणकोणत्या वर्षाच्या लेखापरीक्षणातील अग्रीम व वसुलीपात्र रकमा अद्याप वसूल होणे बाकी आहे, याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी मागितली आहे. (प्रतिनिधी)
रक्कम वसुली होईस्तोवर कारवाई सुरूच
ज्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आॅक्टोबर २०१६ पर्यंत वसुलीपात्र रकमांची वसुली अद्याप पूर्ण झाली नसेल तर अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०१६ पासून निव्वळ देय असणाऱ्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम वसूल करावी, ही कारवाई वसुली होईपर्यंत सुरू ठेवावी, अशा सूचना शेटे यांनी मुख्यलेखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रकमांचा तपशील आयुक्तांकडे सादर करावा
पुरवठादार व कंत्राटदारांच्या देयकांतून लेखा आक्षेपातील वसुलीपात्र रकमा वसूल कराव्यात. त्याशिवाय देयक तपासणी करून प्रदान करू नयेत. तसेच कर्मचारी, अधिकारी व पुरवठादार - कंत्राटदारांकडून वसूल होणाऱ्या अग्रीम व वसुलीपात्र रकमांचा तपशील आयुक्तांकडे व आपल्याकडे दरमहा सादर करावा, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिल्यात.