लालपरीच्या ५० फेऱ्या बंद, महिन्याकाठी सव्वाकोटीचा फटका; प्रवाशांची गैरसोय

By जितेंद्र दखने | Published: April 5, 2023 07:01 PM2023-04-05T19:01:06+5:302023-04-05T19:01:19+5:30

राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

50 rounds of st buses closed, a monthly hit of Rs 1.25 coror loss | लालपरीच्या ५० फेऱ्या बंद, महिन्याकाठी सव्वाकोटीचा फटका; प्रवाशांची गैरसोय

लालपरीच्या ५० फेऱ्या बंद, महिन्याकाठी सव्वाकोटीचा फटका; प्रवाशांची गैरसोय

googlenewsNext

अमरावती: राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तर दुसरीकडे अमरावती विभागातील १०४ एसटी बस एक्स्पायर झाल्याने गत दोन वर्षांपासून लांब पल्ल्याच्या २१ आणि मध्यम पल्ल्याच्या २९ बस फेऱ्या, अशा एकूण ५० फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. परिणामी, दिवसाला १५ हजार किलोमीटर प्रवास कमी झाला आहे. त्यामुळे एसटीला दिवसाकाठी साडेचार लाख रुपयांचा अन् महिन्याकाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. 

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे. त्यांना नाइलाजाने खाजगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचा पर्याय शोधावा लागत आहे. अमरावती विभागाने एसटी महामंडळाकडे १०० नवीन बसची मागणी केली आहे. त्यापैकी २० बस आगामी काही दिवसांत मिळणार असल्या तरी आजघडीला ज्या बस आहेत. त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. त्यापैकी काही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. बसची संख्या जर पुरेशी नसेल, तर साहजिकच फेऱ्या कमी होतील. प्रवाशांना त्या त्यावेळी प्रवास करता येणार नाही.

मग सवलत देऊन फायदाच काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अमरावतीला विभागात नवीन बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे एसटीमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून एसटीने विभागातील एसटी फेऱ्या कायम ठेवल्या असल्या तरी लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्याने लांबवर प्रवास करणारे प्रवासी सध्या त्रस्त आहेत. सध्या अमरावती विभागात ४५ शिवशाही अन् ३ हिरकणी आहेत. या दोन्ही प्रकारच्या बस आरामदायक असल्याने लांब पल्ल्यासाठी वापरल्या जातात; परंतु सध्या त्यापैकी काही या जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी, तसेच नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या शहराकडे पाठवण्यात येतात. त्यांच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत.

२० ते ३० रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे प्रवास भाडे
लांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या बससाठी २० ते ३० रुपये प्रति किलोमीटर भाड्याखाली जाते; परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या शहरांकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या आधीच्या तुलनेत आता ५० टक्के कमी केल्यामुळे साहजिकच उत्पन्नातही घट झाली आहे. २० ते ३० रुपये किमी दराने विचार करता एसटीचे दररोज ४ लाख ५० हजारांचे, तर महिन्याला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे.

एसटी बसची संख्या कमी झाल्यामुळे लांब व मध्यम पल्ल्याच्या बसच्या फेऱ्या या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे एसटीला दिवसाला सुमारे साडेचार लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या फेऱ्या कमी करून जिल्ह्यातील फेऱ्या कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. - नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती
 
४०५ पैकी ३६१ बस विभागाकडे
गत दोन वर्षांपूर्वी अमरावती विभागाकडे ४६५ बस होत्या. त्यापैकी १०४ बस निर्लेखित केलेल्या आहेत. ३६१ बस आहेत. त्यातील सर्वच बस एकाच वेळी रस्त्यावर धावत नाहीत. काही बस दुरुस्ती, आरटीओ पासिंगसाठी जातात.
 

Web Title: 50 rounds of st buses closed, a monthly hit of Rs 1.25 coror loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.