घरकुलाच्या जागेसाठी ५० हजारांची मदत
By admin | Published: January 25, 2016 12:21 AM2016-01-25T00:21:10+5:302016-01-25T00:21:10+5:30
शासकीय योजनांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकूल दिले जाते. मात्र स्वत:ची जागा नसल्यास घरकूल मिळण्यास अडचण निर्माण होते.
अनुदान : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना योजनेतून लाभ
अमरावती : शासकीय योजनांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकूल दिले जाते. मात्र स्वत:ची जागा नसल्यास घरकूल मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून आता घरकुलाच्या जागेसाठीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वत:ची जागा नाही अशा कुटुंबाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात योजनेस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत आहे. यामध्ये केंद्र व राज्याचा वाटा ५० टक्के आहे. केवळ जागेअभावी लाभार्थी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये हा शासनाचा उद्देश आहे. ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास व शबरी आवास योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकूलपात्र परंतु जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहणार आहे. भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी १० हजार रूपये आणि या योजनेंतर्गत ४० हजार रूपये अशाप्रकारे ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत ५०० चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मोठ्या ग्रामपंचायती व शहराशेजारील ग्रामपंचायतींमध्ये जागेचे अधिक दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता ५०० चौरस फुटांपर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दुमजली, तीन मजली इमारत बांधण्यासाठी लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)
असे आहेत जागेसाठीचे नियम
योजनेसाठी ग्रामपंचायतींतर्गत गावठाण हद्दीतील व हद्दीबाहेरील सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली अकृषक जागा, लाभार्थ्याने सहमती दिलेली जागा असावी, लाभार्थ्याला जागा मालकाबरोबर विक्री करार करावा लागणार आहे. जागेची खरेदी करताना समिती समन्वय ठेवणार आहे. जागेचा देय निधी लाभार्थ्याच्या बँक, पोस्ट खात्यावर जमा करण्यास समिती मान्यता देईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. जागेचा देय निधी लाभार्थ्याच्या बँक, पोस्ट खात्यावर जमा करण्यास समिती मान्यता देईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. खरेदीनंतर जागेची नोंद ग्रामपंचायतीकडे समितीमार्फत करण्यात येईल. जागेची नोंद प्राधान्याने लाभधारकांच्या परतीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येणार आहे.