५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका
By गणेश वासनिक | Published: October 21, 2022 06:35 PM2022-10-21T18:35:05+5:302022-10-21T18:37:06+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला
अमरावती : राज्याचे ५० गद्दार गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगले सरकार पाडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘अलिबाबा और चालीस चाेर’ असा उल्लेख करून आमचा कोट्यवधीचा निधी रोखला, अशी टीका वरूड-मोर्शीचेआमदार देवेंद्र भुयार यांनी येथे केली.
वरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार भुयार यांनी निधी रोखल्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
मी भाजपमध्ये जाणार, अशी जाणीवपूर्वक काही लोक माझी बदनामी करीत आहेत. मला भाजपमध्ये जायचे होते, तेव्हाच गेलो असतो. गुवाहाटीमध्ये मौजमजा केली असती आणि ५० खोके घेऊन आलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. मी विराचाराने पक्का आहे, किंबहुना मी गुवाहटीला गेलो असतो तर या लोकांनी शेण घातलं असतं, असेही आमदार भुयार म्हणाले.
त्यावेळी मला जळगावमधून फोन येत होते, गुवाहाटीला ये नाही तर नागपूरला ये, असा निरोप देत होते. परंतु, मी हर्षवर्धन देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. गद्दारी माझ्या रक्तात नाही. माझ्या लग्नात फडणवीस आले. त्यांची माझी रास एक आहे. ते लग्नाला आले म्हणजे मी भाजपमध्ये गेलो, असे होत नाही. पण, विरोधकांनी त्याचेही भांडवल केले. विरोधक बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, मी घाबरत नाही. राजकारण हा माझा पिंड नाही. वडिलोपार्जित शेती असून, ती कसणार, अशी कबुली त्यांनी दिली.
मुंबईत ठाकरेंची दहशत आहेच
मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, हे कोणीही नाकारू शकत नाही, असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले. म्हणून जागतिक पातळीवर त्यांची दखल घेण्यात आली. परंतु, सत्तेसाठी काही गद्दारांनी ठाकरेंना धोका दिला. आता येत्या काळात मतदार त्यांना जागा दाखवून देतील. अंधेरी पूर्व मतदार संघातून ही सुरुवात झाली असून, ती राज्यभर पसरणार, असा विश्वास आमदार भुयार यांनी व्यक्त केला.