५० गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:17 PM2018-09-03T22:17:41+5:302018-09-03T22:18:09+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींकडे ९६ लाखांची वीज देयक थकीत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज महावितरण कंपनीने तीन ते चार दिवसांपासून हा धडाकाच सुरू केल्यामुळे अर्ध्या तालुक्यात अंधाराचे सावट पसरले आहे.
शिवणी रसुलापूर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींकडे ९६ लाखांची वीज देयक थकीत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज महावितरण कंपनीने तीन ते चार दिवसांपासून हा धडाकाच सुरू केल्यामुळे अर्ध्या तालुक्यात अंधाराचे सावट पसरले आहे.
जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना पथदिव्यांच्या देयकाचा निधी दिल्या जातो. मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना मार्च २०१७ पर्यंत थकीत असलेले पथदिव्यांचे देयक जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडून देण्यात येते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून थकीत असलेल्या ९६ लक्ष रूपयांच्या देयकांचा भरणा महावितरणद्वारा वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतींनी केलेला नाही. जिल्हा परिषदेद्वारा दुर्लक्ष केल्यामुळेच सध्या तालुक्यातील ५० चेवर गावे अंधारात आहेत. ग्रामपंचायतींनी महावितरणच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच महावितरणद्वारा ही कारवाई करण्यात आली आहे. महावितरण, जिल्हा परिषद व स्थानिक ग्रामपंचायती यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसला आहे.
पाच वर्षांपासून ९६ लक्ष रूपये थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला. जि.प. संबंधित विभागाकडून वीज देयके अदा करण्याबाबत पत्र मिळाल्यास वीजपुरवठा सुरळीत करू.
- व्ही.एन. शिंदे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण
वीज बिल भरण्याबाबत जि.प. प्रशासन तसेच पंचायत समिती प्रशासनाला माहिती दिली. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरेने पाठपुरावा करीत आहोत.
- विजय बिसने,
सरपंच, शिवणी रसुलापूर