जिल्ह्यातील तब्बल ५० हजार वाहनचालकांनी थकवली तीन कोटी रुपयांची दंड रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 11:04 AM2024-05-18T11:04:06+5:302024-05-18T11:04:30+5:30
८८ टक्के दंड वसुली थकली : महिन्याकाठी वाढत चाललेय अनपेड ई-चलान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण पोलिस दलातील जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिलदरम्यान तब्बल ६७ हजार ७३५ वाहनचालकांना ई-चलानने ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८०० रुपये दंड ठोठावला. त्यातील केवळ १२ टक्के अर्थात १७ हजार ९७३ वाहनचालकांनी ४२ लाख २२ हजार ९०० रुपये दंड भरला, तर तब्बल ४९ हजार ७६२ वाहनधारकांनी त्यांच्याकडे असलेला ३ कोटी १ लाख ४८ हजार ९०० रुपये दंड भरलाच नाही. ती रक्कम अनपेड राहिली. अर्थात, ती रक्कम त्या वाहनचालकांनी भरलीच नाही. दर महिन्यात, दरवर्षी त्या अनपेड चलनाच्या रकमेत कोट्यवधींची वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतूकविषयीच्या उपाययोजना राबविण्यास मर्यादा येत आहेत.
दंड भरा; अन्यथा खटला दाखल
अनपेड चलानधारकांनी त्यांच्या वाहनांवरील दंड वाहतूक शाखेसह जवळच्या पोलिस ठाण्यात भरावा. दंड थकीत राहिल्यास संबंधित वाहनधारकाचा परवाना निलंबित केला जाऊ जातो. प्रसंगी तो रद्ददेखील केला जातो तसेच दंडाकडे पाठ फिरविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटला भरला जातो. ते टाळण्यासाठी वाहनचालकांनी आपल्याकडे थकीत दंडाची रक्कम त्वरेने भरावी, असे आवाहन ग्रामीण वाहतूक शाखाप्रमुख
सतीश पाटील यांनी केले आहे.
गतवर्षीचेही ८.८८ कोटी रुपये थकीत
ग्रामीण वाहतूक शाखेने वर्ष २०२३ या वर्षभरात एकूण २ लाख १२ हजार ४३८ वाहनचालकांना १०.६७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. पैकी केवळ १ कोटी ७८ लाख ९१ हजार ६५० रुपये दंड वसूल केला, तर तब्बल ८.८८ कोटी रुपये दंड थकला आहे. यंदाच्या चार महिन्यांत अनपेड चलानमध्ये ३.४३ कोटींची भर पडली आहे.
ग्रामीण वाहतूक विभागाने यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत ६७,७३५ बेशिस्त वाहनधारकांना ३.४३ कोटी रुपयांचा दंड ई-चलानने आकारला. पैकी केवळ ४२.२२ लाख रुपये वाहनचालकांनी भरले. अनपेड चलानची रक्कम ३.०१ कोटींच्या घरात आहे. चलानधारकांनी तो थकीत दंड त्वरित भरावा.
- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक