पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ४८.५१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:17 PM2019-08-29T13:17:58+5:302019-08-29T13:18:29+5:30
२८ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती दोन आठवड्यात चांगली सुधारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संदीप मानकर
अमरावती : गेल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीत लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांचा सरासरी पाणीसाठा ५०.७५ टक्के झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.
सरासरी ५० टक्के पाणीसाठा म्हणजे किमान एक वर्षांची तरी पिण्याच्या पाण्याची सोय झाली असून, काही प्रकल्पांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा नसल्याने त्या भागातील नागरिकांची चिंता कायम आहे. २८ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती दोन आठवड्यात चांगली सुधारली आहे. ५०.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांचा पाणीसाठा वाढत असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्याचे मत जलतज्ज्ञांनी वर्तविले आहे. परतीच्या पावसात मोठे प्रकल्प भरतात, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ५०२ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा १५३९.६७ दलघमी आहे. त्याची सरासरी टक्केवारी ४८.५१ इतकी आहे.
नऊ मोठ्या प्रकल्पांत ५०.७५ टक्के पाणीसाठा
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ६५.२६ टक्के पाणीसाठा आहे. मध्यप्रदेशात चांगला पाऊस झाल्याने नद्यांना आलेल्या पुरामुळे वर्धा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे अमरावती शहरवासीयांची पाण्याची समस्या मिटली आहे. आणखी धरण भरल्यास सिंचनाचाही प्रश्न सुटणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ४०.०७ टक्के पाणीसाठा आहे. अरूणावती १२.२४ टक्के, बेंबळा ७८.४८ टक्के पाणीसाठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९.४५ टक्के, वान ८५.२२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २३.३७ टक्के, पेनटाकळी ७७.५७ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात बिकट पाणीटंचाई निर्माण झाली होती. दोन प्रकल्पांमध्ये यंदा पाणीसाठा वाढल्यामुळे काही प्रमाणात टंचाईवर मात शक्य होणार आहे.
२४ मध्यम प्रकल्पांची स्थिती
अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ८७.८४ टक्के पाणीसाठा साचला असून, ५ सें.मी.ने ४ गेट उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा ९१.०३ टक्के पाणीसाठा असून, ५ सें.मी.ने ३ गेट उघडले आहे. पूर्णा प्रकल्पात ८७.४२ टक्के पाणीसाठा असून, २० सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे. सपन प्रकल्पात ९१.५० टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ८८.४३ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ४९.८९ टक्के, वाघाडी ५०.५९ टक्के, बोरगाव ७३.२२ टक्के नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १६.६४ टक्के, मोर्णा २२.९९ टक्के. उमा १०.५३ टक्के, घुगंशी बॅरेज शून्य टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ८.२१ टक्के सोनल १६.२५ टक्के, एकबुर्जी ४१.८५ टक्के, बुलडाणा जिल्हा ज्ञानगंगा ८७.५६ टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ४८.७१ टक्के, तोरणा ७५.२९ टक्के उतावळी ४४.१६ टक्के पाणीसाठा आहे.