जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांची ५१ पदे रिक्त
By admin | Published: July 11, 2017 12:14 AM2017-07-11T00:14:40+5:302017-07-11T00:14:40+5:30
अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.
कामाचा ताण वाढला : गुन्ह्यांचा तपास, निपटारा करण्याचे आव्हान
चेतन घोगरे। लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : अपुऱ्या मनुष्यबळावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल ५१ पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती आज समोर आली आहे. या रिक्त जागांमुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
जिल्ह्यात ३१ पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे थोड्याफार प्रमाणात रिक्त आहेत. आज रोजी हाती लागलेल्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना दोन-दोन विभागाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या सुरक्षेबरोबरच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, निपटारा करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा पोलीस दलाला सहन करावे लागत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयासह ३१ पोलीस ठाण्यात २५३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. यातील पोलीस शिपयाची ७४ पदे रिक्त आहेत, तर जिल्ह्यात १९५ पोलीस अधिकाऱ्यांची एकूण पदे आहेत. त्यात पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
उपअधीक्षकांच्या बदल्या पण नवीन नियुक्ती नाही
जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय कार्यालयातील दोन्ही उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र तेथे नवीन उपअधीक्षकाच्या नियुक्त्या अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीत.