५.१३ लाखांची अवैध दारू जप्त
By admin | Published: May 5, 2017 12:13 AM2017-05-05T00:13:02+5:302017-05-05T00:13:02+5:30
मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी तालुक्यातील एका बारमधून ५.१३ लाख रुपये किमतीची दारू जप्त केली.
दोघांना अटक : देशी, विदेशी दारूचा समावेश
धामणगाव रेल्वे : मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी तालुक्यातील एका बारमधून ५.१३ लाख रुपये किमतीची दारू जप्त केली. गुरुवारी ही धाडसी कारवाई करण्यात आली. १ एप्रिलपासून महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारुविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा येथील लालाजी बार अॅन्ड रेस्टारंटमधून अवैधरीत्या दारुविक्री होत असल्याची माहिती पोलीस अधिकारी अमित वानखडे यांना मिळाली. त्याआधारे वानखडे यांच्यासह जमादार सिरसाट, पोलीस शिपाई शाम नाखले, विनोद राठोड आणि प्रमोद इंगळे यांच्या पथकाने लालाजी बार अॅन्ड रेस्टॉरेंटवर धाड टाकली. तेथून ५.१३ लाख रुपये किमतीची दारू हस्तगत करण्यात आली. यात विदेशी दारुचा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. येथून मंगेश कैलुके आणि अंकेश चंद्रभूषण जैस्वाल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तालुक्यातील ९० टक्के बार बंद झाल्याने एकीकडे मद्यपींची पंचाईत झाली असताना दुसरीकडे जे बार बंद झालेत तेथून अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतूक सुरू आहे.