५२ उमेदवारी अर्ज बाद
By admin | Published: February 5, 2017 12:01 AM2017-02-05T00:01:15+5:302017-02-05T00:01:15+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांकडून काही त्रुटी राहिल्याने अनेक नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले आहेत.
छाननीला उशीर : निवडणूक अधिकाऱ्यांशी उमेदवारांची वादावादी
अमरावती : उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांकडून काही त्रुटी राहिल्याने अनेक नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले आहेत. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले. शुक्रवारी शेवटच्या दिवशी आॅनलाईन नामांकन भरताना प्रचंड गोंधळ उडाला. त्यात वेळेवर वितरित करण्यात आलेल्या 'बी' फॉर्मच्या गोंधळाने भर पाडली. शनिवारी नामांकन अर्जांची छाननी करण्यात आली; महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांच्यानुसार ५२ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. या संख्येत उशिरा रात्रीपर्यंत बदल संभवतो.
२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. ३ फेब्रुवारीपर्यंत २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी एकूण ७७६ अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी ३४५ उमेदवारी अर्ज महिलांचे आहेत. दरम्यान, महापालिकेच्या मतदार यादीमध्ये नावे नसल्याने शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे नामांकन रद्द ठरविण्यात आल्याची माहिती आहे. बी फॉर्म वेळेवर न पोहोचल्याने काही उमेदवारांना अपक्ष म्हणून रिंंगणात राहावे लागणार आहे. काँग्रेसनगर, फे्रजरपुरा येथील ब जागेची उमेदवारी काँग्रेसने चेतन वानखडे यांना घोषित केली होती. मात्र त्यांचे नामांकनच दाखल झालेले नाहीत. याशिवाय सुजाता बोबडे यांना प्रभाग क्र.१२ मधील 'क' जागेची उमेदवारी देण्यात आली होती. अर्चना सवाई यांना काँग्रेसने 'ब' जागेची अधिकृत उमेदवारी दिली. मात्र प्रत्यक्षात सुजाता बोबडे यांचे नाव 'ब' जागेवर काँग्रेसच्या उमेदवार म्हणून
७२२ उमेदवार रिंगणात
अमरावती : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. तर अर्चना सवाई यांना 'ब' याच जागेमधून अपक्ष उमेदवार ठरविले आहे. रुख्मिणीनगर, स्वामी विवेकानंद कॉलनी प्रभागातील ब जागेवर एकूण ६ महिला उमेदवार आहे. त्यात सुजाता बोबडे आणि अर्चना सवाई यांचा अनुक्रमे काँग्रेस व अपक्ष म्हणून समावेश असल्याने हमालपुरा झोनमध्ये मोठा गोंधळ उडाला. उशिरा संध्याकाळपर्यंत अर्चना सवाई या हमालपुरा झोन कार्यालयात बसल्या होत्या. तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सवाई यांची उमेदवारी आणि त्यांनी दाखल केलेला बी फॉर्म याबाबत वृत्त लिहिस्तोवर कुठलाही निर्णय घेतला नव्हता. अर्चना सवाई यांच्या बी फॉर्ममध्ये झालेली गफलत आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे रद्द झालेले अर्ज याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेच्या शहरप्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याशिवाय काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे कार्यालय कुलूपबंद होते. दरम्यान झोन १ मधून ५, झोन २ मधून ६, झोन ३ मधून ९, झोन ४ मधून ४, झोन ५ मधून ३, झोन ६ मधून ९ तथा झोन ७ सर्वाधिक १७ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्यामुळे आता २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी ७२२ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान शिक्षण विभाग अंबापेठ झोनमधील निवडणूक निर्णय अधिकारी गौतम वालदे यांच्याशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची शाब्दीक चकमक झाली. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न झाला. मात्र याबाबत कुठलीही तक्रार नोंदविल्या गेली नाही.
प्रभाग क्र. २१ मध्ये सर्वाधिक उमेदवार
प्रभाग क्र. १ मध्ये ४२, २ मध्ये ३६, ३ मध्ये ३४, ४ व ५ मध्ये प्रत्येकी ३९, ६ मध्ये ३२, ७ मध्ये २२, ८ मध्ये ४८, ९ मध्ये २९, १० मध्ये ३२, ११ मध्ये ३४, १२ मध्ये ३०,१३ मध्ये २९, १४ मध्ये ४२, १५ मध्ये ३३, १६ मध्ये २८, १७ मध्ये २४, १८ मध्ये २६, १९ मध्ये २८,२० मध्ये ३८, २१ मध्ये ६३ आणि प्रभाग क्रमांक २२ मध्ये एकुण ४८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेत.
३४५ महिलांची उमेदवारी दाखल
२१ प्रभागात अ,ब,क,ड अशा प्रत्येकी चार जागा, तर एसआरपीएफ प्रभागात अ,ब,क अशा तीन जागा आहेत. २२ प्रभागातील 'अ' जागांसाठी एकूण २०४, 'ब' जागांसाठी १४३, 'क' जागेसाठी १८४ तर 'ड' जागांसाठी २४५ असे एकूण ७७६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात ३४५ महिला उमेदवारांचा समावेश आहे.