राज्यात आठ महिन्यात ५३२ एसीबी ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:01+5:302021-09-12T04:16:01+5:30
अमरावती/ संदीप मानकर राज्यात आठ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५३२ ट्रॅप यशस्वी केले. यामध्ये ७४७ आरोपी अडकले असून, कोरोनाकाळातही ...
अमरावती/ संदीप मानकर
राज्यात आठ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५३२ ट्रॅप यशस्वी केले. यामध्ये ७४७ आरोपी अडकले असून, कोरोनाकाळातही लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे. राज्यात लाच खाण्यात पुणे विभाग अव्वल स्थानावर असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या विभागात सर्वाधिक १०९ सापळे यशस्वी झाले आहेत.
राज्यात १ जानेवारी ते ८ सप्टेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत ५३३ एसीबी सापळे, ६ अपसंपदा प्रकरणे, तर २ अन्य भ्रष्टाचाऱ्याचे असे एकूण ५४० गुन्ह्यांमध्ये ७६९ आरोपींचा समावेश आहे. २०२० या वर्षात ६३० ट्रॅप यशस्वी झाले होते. राज्यात यंदा सर्वात कमी ट्रॅप हे ३४ मुंबई विभागात झाले. ठाणे ५७, नाशिक ९१, नागपूर ४७, अमरावती ५२, औरंगाबाद ९९, तर नांदेड विभागात ४३ ट्रॅप पडले. यंदा कोरोना काळ असतानाही लाचखोरीच्या प्रमाणात घट झाली नाही, हे विशेष!
बॉक्स
लाचखोरीत महसूल विभाग अव्वल
लाचखोरीत पुन्हा महसूल विभागच अव्वलस्थानी असून महसूल, भूमीअभिलेख व नोंदणी कार्यालयतात राज्यात आठ महिन्यात १३३ सापळे यशस्वी झाले. यामध्ये १४ प्रथम श्रेणी अधिकारीसुद्धा अडकले आहेत. वर्ग - २ चे चार, वर्ग ३ चे १११ व वर्ग ४ चे ११ इतर लोकसेवक १४ आणि खासगी व्यक्ती ३९ असे एकूण १९३ आरोपींचा समावेश आहे. पोलीस विभागात १०८ ट्रॅप यशस्वी झात्याने लाचखोरीत हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. महावितरण ३९, महानगरपालिका ३, जिल्हा परिषद २४, पंचायत समिती ४३ व वनविभाग १४, सार्वजनिक बांधकाम विभाग ८, तर आरटीओ ८, शिक्षण विभाग १९ तसेच यामध्ये इतर विभागांचासुद्धा समावेश आहे.
बॉक्स
अपसंपदेची सहा प्रकरणे
राज्यात अपसंपदेची सहा प्रकरणे दाखल झाले आहेत. त्यात १० आरोपींचा समावेश आहे. अन्य भ्रष्टाचाराचे दोन प्रकरण दाखल झाले असून त्यामध्ये १२ आरोपींचा समावेश आहे. अपसंपदेचे चार गुन्हे हे मुंबई विभागात आणि दोन गुन्हे पुणे विभागात दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.