५४ अल्पवयीन मुलं-मुली अपहरणानंतर बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:17 PM2018-12-03T22:17:05+5:302018-12-03T22:17:46+5:30
जिल्ह्यातील ५४ अल्पवयीन मुले-मुली अपहरणानंतर बेपत्ताच असल्यामुळे त्यांचा आॅपरेशन मुस्कानद्वारे पोलीस विभागाने शोध चालविला आहे. शहर व ग्रामीण अशा एकूण ४१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटना असून, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या बेपत्ता, हरविलेल्या व अपहृत मुला-मुलींचा कसून शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ५४ अल्पवयीन मुले-मुली अपहरणानंतर बेपत्ताच असल्यामुळे त्यांचा आॅपरेशन मुस्कानद्वारे पोलीस विभागाने शोध चालविला आहे. शहर व ग्रामीण अशा एकूण ४१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटना असून, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या बेपत्ता, हरविलेल्या व अपहृत मुला-मुलींचा कसून शोध घेत आहेत.
१८ वर्षांखालील बेपत्ता व अपहृत बालकांचा शोध घेऊन, त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी शासनाने आॅपरेशन मुस्कॉन ही मोहीम सुरू केली. या मोहिमेसाठी प्रत्येक ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस विभागाकडून १ ते ३१ डिसेंबरपर्यंत आॅपरेशन मुस्कॉन अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, तर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून महिलासह सर्व ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविली जात आहे. ग्रामीण हद्दीतील ३१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०१६ मध्ये १५७ अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०१७ मध्ये १३४, तर नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४२ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी ३६ मुली व ५ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. त्याप्रमाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत नोव्हेंबर २०१८ पर्यंत ९५ अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सन २०१७ ते २०१८ दरम्यान दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यापैकी १८ मुली व ५ मुले अद्यापही मिळून आलेले नाहीत. या सर्व मुला-मुलींचा शोध आॅपरेशन मुस्कॉन मोहिमेद्वारा घेतला जात आहे.
प्रेमप्रकरणातून सर्वाधिक अपहरणाचे गुन्हे
आजच्या आधुनिक काळातील १८ वर्षांखालील अल्पवयीन मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत असून, प्रेमप्रकरणातून अनेक मुले-मुली पळून गेल्याचेही निदर्शनास आले आहेत. नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्हाभरात २३७ अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे प्रेमप्रकरणाची आहेत. यापैकी बहुतांश गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे.
पोलीस असा घेणार शोध
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रेल्वेस्थानके, रुग्णालये, उद्याने, व्यापारी संकुल, कारखाने व सार्वजनिक ठिकाणी फिरणारे, भीक मागणाºया मुला-मुलींशी संपर्क साधून, त्यांची चौकशी करणार आहेत. त्यानंतर संबंधित बालकांचा रेकॉर्ड तपासून, त्या बालकांना आई-वडिलांपर्यंत पोहोचवून दिले जाणार आहे.
का केले जाते अपहरण?
१८ वर्षांखालील बालक बेपत्ता, हरविला किंवा अपहरण झाल्यास पोलीस भादंविच्या कलम ३६३ (अपहरण) चा गुन्हा नोंदवितात. यामध्ये प्रेमप्रकरणाचे प्रमाण सर्वाधिक आढळून आलेत. मात्र, ज्या बालकांचा शोध लागला नाही, त्याच्याशी अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. लहान बालकांचे अपहरण करून दुसºया शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून, त्यांच्याकडून भीक मागविली जाते. काही मुलींना देहविक्रीच्या कामी लावले जाते, काहींना गुन्हेगारीकडे वळविण्यात येते आदी प्रकारांसाठी लहान मुलांचा अपहरण करून वापर केला जाऊ शकतो.
सामाजिक संघटनांची उदासीनता
बालकांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. परंतु, त्या बालकांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले जाते. आई-वडील नसल्यास त्या बालकांना बालकल्याण समितीपुढे उभे करण्याचे काम पोलीस करतात. त्यानंतर त्यांना बालगृहात नेऊन सोडले जाते. या बालकांच्या शिक्षणासाठी सामाजिक संघटनांनी पुढे घ्यायला हवे, मात्र, जिल्ह्यातील बहुतांश सामाजिक संघटना यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.
बेपत्ता व हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी 'आॅपरेशन मुस्कॉन' राबविले जात आहे. बालक मिळून आल्यानंतर चाईल्ड केअरकडे सोपविले जाते. ते पुढील प्रक्रिया राबवितात.
- दिलीप झळके, पोलीस अधीक्षक
हरविलेल्या व बेपत्ता बालकांचा शोध घेऊन त्यांना आई-वडिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आॅपरेशन मुस्कॉन मोहीम राबविली जात आहे. १ ते ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविली जात आहे.
- नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, महिला सेल