‘जुन्या पेन्शन’साठी आवाज बुलंद, ५४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:38 PM2023-03-14T15:38:12+5:302023-03-14T15:39:23+5:30
बेमुदत संप सुरु, शासकीय कामकाज प्रभावित, जिल्हाधिकारी कार्यालय चौकात संघटनांचे धरणे
गजानन मोहोड
अमरावती : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद करीत मंगळवारपासून बेमुदत संप पुकारल्याने शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. संपात सहभागी सर्व शासकीय कर्मचारी संघटनांनी येथील जिल्हाधिकारी चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईस्तोवर आता माघार नाही, असा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी आता ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, या प्रमुख मागणीसह कंत्राटी, रोजंदारी व बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे तातडीने भरा, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालकांची पदे निरसित करु नका, यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी शासनाला अल्टिमेटम दिला होता, मात्र, शासनाद्वारा सकारात्मक प्रतिसाद नसल्याने मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
या कर्मचारी संपाचा फटका सर्वाधिक सर्वसामान्य नागरिकाला बसला आहे. त्यांची कामे रखडली आहेत. कामानिमित्त शासकीय कार्यालयात आलेल्या अनेक नागरिकांना कामाशिवाय परतावे लागले आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवादेखील काही प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून आले.