५४२ तलाठी, मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर; महसुली कामकाज प्रभावित
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 3, 2023 06:08 PM2023-11-03T18:08:34+5:302023-11-03T18:09:44+5:30
माघार नाही, संघटना आंदोलनावर ठाम
अमरावती : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४५२ तलाठी, ९० मंडळ अधिकारी शुक्रवारपासून सामूहिक रजेवर गेल्याने महसुली कामकाज प्रभावित झालेले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत माघार नाही, असा पवित्रा घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विदर्भ पटवारी संघ नागपूरच्या अमरावती जिल्हा शाखेचे ४५२ तलाठी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक महत्त्वाची कामे प्रभावित झालेली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे दाखले, सात-बारा, आठ (अ), फेरफार प्रकरणे, उत्पन्नाचे दाखले, शेतीसंदर्भात कामे, अहवाल, पाहणी, ई-पीक पाहणी यासह अन्य कामकाजाचा खोळंबा झालेला आहे.
डीपीसीमध्ये गुरुवारी पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले; मात्र कालबाह्य झालेले लॅपटॉप, प्रिंटर, यासह तलाठी कार्यालयात सुविधा नाहीत, तसेच सेवापुस्तिका अपडेटसह इतरही मागण्या प्रलंबित आहेत. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन माघारी घेतले जाणार नसल्याची माहिती संघटनेचे सचिव जगदीश पानसे यांनी दिली.