घरगुती बियाण्यांमुळे ५५ कोटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:41+5:30
जिल्ह्यात यंदा २.६८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची क्षेत्र आहे. यासाठी किमान १.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मार्केटमधून खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षीच आठ हजार रुपये क्विंटल दराप्रमाणे शेतकऱ्यांनी किमान १०० कोटींचे बियाणे खरेदी केलेले आहे. वास्तविक पाहता सोयाबीन हे स्वपरागसिंचित सरळ वाण असल्याने दरवर्षी मार्केटमधून नवीन बियाणे खरेदी करून पेरणी करण्याची आवश्यकता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा अटॅक व अतिपावसाने सोयाबीनची प्रतवारी यंदाही खराब होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ चांगल्या प्रतीचे सोयाबीन आहे, त्यांनी राखून ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. याद्वारे जिल्ह्यात किमान ५० ते ५५ लाखांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात यंदा २.६८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची क्षेत्र आहे. यासाठी किमान १.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मार्केटमधून खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षीच आठ हजार रुपये क्विंटल दराप्रमाणे शेतकऱ्यांनी किमान १०० कोटींचे बियाणे खरेदी केलेले आहे. वास्तविक पाहता सोयाबीन हे स्वपरागसिंचित सरळ वाण असल्याने दरवर्षी मार्केटमधून नवीन बियाणे खरेदी करून पेरणी करण्याची आवश्यकता नाही. सर्र्वसाधारणपणे शेतकरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन बियाणे बाजारातून खरेदी करतात. १० टक्के शेतकऱ्यांनी विकत घेतल्यास हरकत नाही. मात्र, ९० टक्के शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे तयार करून वापरायला पाहिजे. विशेष म्हणजे बाजारात आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर आहे. उत्पादन करून विकताना सोयाबीनला ३५०० ते ३८०० रुपये असा दर मिळतो. त्यामुळे शेतकºयांनी किमान १० टक्के क्षेत्रावरील बियाणे तयार करून पेरणीसाठी वापरल्यास उगवणक्षमतेबाबत खात्री असते.
चालू हंगामात ज्या शेतकºयांनी सुधारित जातीचे बियाणे पेरले असतील त्यांनी पुढील हंगामाकरिता बियाणे तयार करून राखून ठेवावे बियाण्यांची उगवणक्षमता मार्च ते जून महिण्यात तपासून पहावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवळे यांनी केले आहे.
मळणी पारंपरिक पद्धतीने हवी
सोयाबीनची मळणी पारंपरिक पद्धतीने काठीच्या साहाय्याने बडवून करावी. मळणीयंत्राद्वारे करायची झाल्यास ३५० ते ४५० वर फेरे व्हायला नकोत. त्यामुळे बियाण्यास इजा होणार नाही. मळणीयंत्रातील लोखंडी ड्रमवर रबर किंवा स्पंज लावला असल्यास बियाण्यांची गुणवत्ता चांगली राहील. मळणी ड्रमच्या चाकाची पुली व बेल्टची साईज वाढवून सुद्धा यंत्राचे फेरे कमी करता येतात, वाळलेले स्व्छ बियाणे ६० किलोपर्यंत ज्युट बारदाण्यातच भरावे. थप्पी ४ फुटांवर जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
असे करा घरीच बियाणे तयार
ज्या शेतकºयांनी सोयाबीनच्या प्रमाणीत बियाण्यांची तसेच १० वर्षाआतील प्रसारीत वाणाची पेरणी केलेली असेल अश्या शेतकºयांनी त्यांच्याकडे उत्पादीत सोयाबीन प्राधान्यानी राखूण ठेवावे. ज्या क्षेत्रातील सोयाबीन बियाणे निवडायचे आहे. अशा क्षेत्राच्या सभोवती तीन मीटर अंतर सोडून आतील उत्पादीत होणारे सोयाबीन बियाण्यांसाठी निवडावे. पाऊस आल्यास बियाण्यांची उगवणक्षमता कायम राखण्यासाठी पीक परिपक्वअवस्थेत असताना कापणीपूर्वी बावीस्टीन किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी.