१९ कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत ५५८ उमेदवारांची लेखी परीक्षा
By admin | Published: April 9, 2016 12:02 AM2016-04-09T00:02:39+5:302016-04-09T00:02:39+5:30
विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा शुक्रवारी शांततेत पार पडली.
पोलीस भरती : 'व्हीएमव्ही'त तगडा बंदोबस्त
अमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा शुक्रवारी शांततेत पार पडली. पहिल्या दिवशी १९ कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत ५५८ उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली असून परीक्षेदरम्यान ग्रामीण व शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
ग्रामीण पोलीस दलातील भरतीसाठी ४ हजार २४३ अर्ज आले होते. मैदानी चाचणीत १ हजार २२६ उमेदवार उत्तीर्ण झाले. यापैकी ५८१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांची शुक्रवारी विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात लेखी परीक्षा दुपारी दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी ५५८ उमेदवार उपस्थित होते. यामध्ये ४७८ पुरुष व ८० महिला उमेदवारांचा समावेश होता. प्रत्येक वर्ग खोलीत एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी व एक व्हिडीओग्राफर ठेवण्यात आले होते. पुरुष उमेदवारांसाठी वेगळे वर्ग तर मुलींची परीक्षा एकाच हॉलमध्ये घेण्यात आली.
इन कॅमेरा लेखी परीक्षा
पोलीस भरतीत पारदर्शकता यावी या उद्देशाने लेखी परीक्षा इनकॅमेरा घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर तब्बल १९ व्हिडीओग्राफर तैनात होते.
परीक्षार्थींचे आगळे स्वागत
ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत सहभागी उमेदवारांचे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले. परीक्षा केंद्राच्या वर्ग खोलीतील ब्लॅकबोर्डवर परीक्षार्थींचे स्वागत करणारे वाक्य लिहिण्यात आले होते. आजपर्यंतच्या पोलीस भरतीप्रक्रियेत पहिल्यांदाच हा आगळावेगळा प्रकार पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या संकल्पनेतून पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा सुरू होती.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पोलीस पदभरती प्रक्रिया पारदर्शक होण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलीस अधीक्षक मकानदार, डीवायएसपी शिवातारे (अंजनगाव) व अमोल गायकवाड (दर्यापूर) यांच्या नेत्तृत्वात सहा पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक व १२५ पोलीस कर्मचारी परीक्षा केंद्रावर तैनात होते. (प्रतिनिधी)