बीटी बियाण्याच्या दरवाढीने ५.६० कोटींचा भुर्दंड; पाकिटामागे ४३ रुपये वाढले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 10, 2023 04:06 PM2023-05-10T16:06:43+5:302023-05-10T16:06:52+5:30
क्षेत्रवाढीने यंदा १३ लाख पाकिटांची मागणी
अमरावती- यंदाच्या हंगामात कपाशीच्या क्षेत्रवाढीची शक्यता असतानाच बीटीच्या प्रत्येक पाकिटामागे ४३ रुपयांनी वाढ झालेली आहे. गतवर्षी ८१० रुपयांना मिळणारे ४७५ ग्रॅमचे पाकीट यंदा ८५३ रुपयांना शेतकऱ्यांना घ्यावे लागणार आहे. खरिपात २.६० लाख हेक्टर प्रस्तावित कपाशी क्षेत्रासाठी १३ लाख पाकिटांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना किमान ५.६० कोटींचा नाहक भुर्दंड बसणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने २.६० लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे व त्यासाठी किमान १३ लाख बीजी-२ या वाणाची पाकिटे लागणार आहे. त्यापूर्वी केंद्र शासनाने २४ मार्चला अधिसूचना काढून ४७५ ग्रॅमच्या बीजी-१६३५ व बीजी-२ च्या पाकिटासाठी ८५३ रुपये दर निश्चित केलेले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यासाठी ५.६० कोटींचा फटका बसणार आहे.