समप्रमाणात गावांच्या वाटपाने सुटला ५६० कोटींचा तिढा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 07:20 PM2022-10-04T19:20:51+5:302022-10-04T19:22:03+5:30
समप्रमाणात गावांच्या वाटपाने 560 कोटींचा तिढा सुटला आहे.
गजानन मोहोड
अमरावती : बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाच्या याद्या कुणी करायच्या, यावरून रखडलेला शासन निधी वाटपाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. विभागीय आयुक्तांनी या संघटनांसोबत चर्चा करून सुवर्णमध्य साधला आहे. यानुसार समप्रमाणात गावांचे वाटप करण्यात येऊन याद्या तयार करण्यात येणार असल्याने अखेर तिढा सुटला आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्टदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे ३,१३,९०६ शेतकऱ्यांची शेतीपिके बाधित झाली. याबाबत पंचनामे करण्यात आले व शासनाने निकषाचे वाढीव मदत दिली.
त्यानुसार जिल्ह्यास ५६० कोटी २६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र, मदतनिधी वाटप करण्याच्या याद्या करण्याचे विदर्भ तलाठी संघांद्वारा नाकारण्यात आले. याद्या कृषी विभागाने तयार कराव्या व त्यांच्यामार्फतच वाटप करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रिया रखडली होती. २४ फेब्रुवारी २०१६ च्या शासनादेशानुसार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर महसूल यंत्रणेमार्फत पार पाडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सोबतच जिल्हाधिकारी यांना इतर विभागाच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार आहेत. यानुसार चर्चेत तोडगा निघाल्याने सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना लवकरच शासन मदत मिळणार आहे.