५६० तलाठ्यांची संपात उडी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 20, 2023 04:49 PM2023-03-20T16:49:34+5:302023-03-20T16:51:22+5:30
मार्च महिन्यातील महसुलावर परिणाम
अमरावती : कर्मचारी संपामुळे जिल्हा प्रशासनाच्या अडचणी दिवसेनदिवस वाढत आहेत. सोमवारपासून जिल्ह्यातील ५६० तलाठी संपात सहभागी झाल्याने महसूल विभागाची सेवा विस्कळीत झालेली आहे. आता अवकाळीने बाधित पिकांचे पंचनामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला असून मार्च महिन्यातील महसुलावरही याचा चांगलाच परिणाम होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय विभागाचे कर्मचारी एक आठवड्यांपासून संपावर आहेत. यामध्ये विदर्भ पटवारी संघ सहभागी नव्हता. आता विदर्भ अध्यक्ष बाळकृष्ण गाडगे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील ५६० तलाठी २० मार्चपासून संपात सहभागी झाल्याचे जिल्हाध्यक्ष विकास ढोले यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील तलाठी मंगळवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देणार असल्याचे ढोले म्हणाले.
अवकाळीचे पंचनामे रखडणार
पाच दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील किमान तीन हजार हेक्टरमधील गहू, हरभरा, संत्रा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही भागात ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने बाधित पिकांचे पंचनामे कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२७ पासून मंडळ अधिकारीदेखील संपावर
सध्या जिल्ह्यातील ५६० तलाठी संपावर आहेत. त्यांच्या या आंदोलनाला ९५ मंडळ अधिकाऱ्यांचा पाठींबा आहे व मागण्या मान्य न झाल्यास मंडळ अधिकारीदेखील २७ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास ढोले यांनी सांगितले.