५७ टक्केच शाळा प्रगत !
By admin | Published: April 10, 2017 12:12 AM2017-04-10T00:12:14+5:302017-04-10T00:12:14+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करून तेथे ‘ई-लर्निंग’ वर भर देण्यात येत असून
कासवगती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाला बाधा
अमरावती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करून तेथे ‘ई-लर्निंग’ वर भर देण्यात येत असून या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमामुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांचा गुणवत्तेचा स्तर उंचावत असला तरी जिल्ह्यात मात्र शाळांच्या प्रगतीची गती मंदावल्याचे आकडेवारीवरू न दिसृून येते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७ टक्केच शाळा शंभर टक्के प्रगत झाल्याचे दिसते.
शासनाने २२ जून २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. याउपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीचे चाचणीच्या माध्यमातून मूल्यमापन करणे, भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, ज्ञानरचनवाद शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. शाळा डिजिटल करून चार विद्यार्थ्यांमागे एक ‘टॅबलेट’ देऊन त्यांना स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांमधील ७० ते ८० टक्के शाळा प्रगत आहेत. यातुलनेत जिल्ह्यातील शाळांच्या प्रगतीची गती अतिशय मंद आहे. ‘शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमा’स शहरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात अगदी Þउलट परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याचा निष्कर्ष प्राप्त आकडेवारीवरून काढला जाऊ शकतो. जिल्ह्यातील १,६०१ प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांपैकी अर्ध्या शाळासुद्धा प्रगत झाल्या नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७ टक्के शाळाच प्रगत झाल्या आहेत. या उपक्रमाला शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्राथमिक शाळांच्या प्रगतीचा टक्का घसरला आहे. याकारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांपुढे उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
तालुकानिहाय प्रगत शाळा
अमरावती ६३, भातकुली ७८, अचलपूर १०३, नांदगाव खंडेश्र्वर ९०, अंजनगाव सुर्जी ३८, दर्यापूर ५७, चांदूरबाजार ५६, वरूड ६८, मोर्शी ४२, चांदूररेल्वे ६७, धामणगांव रेल्वे ६६, तिवसा ५८, धारणी ५५, चिखलदरा ६२, प्राथमिक शाळा ६१४ आणि उच्च प्राथमिक अशा २९० शाळा प्रगत झाल्या आहेत. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ६०१ शाळांपैकी ९०४ शाळांची प्रगती झाल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जिल्ह्यातील शाळांची प्रगती संथगतीने होत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. शाळांच्या प्रगतीची गती कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- एस.एम.पानझाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक