संतापजनक! आदिवासी आश्रमशाळेतील ५७ विद्यार्थ्यांना १७ सीटर वाहनात कोंबून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 10:40 AM2022-10-20T10:40:37+5:302022-10-20T10:57:08+5:30
बोराळाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेची आदिवासी विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक
परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या आदिवासी भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना गावी सोडण्यासाठी एका वाहनात गुरांप्रमाणे कोंबून नेत असल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातील अंजनगाव स्टॉपवर सामाजिक कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेने उघडकीस आला. घाबरलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून दुसऱ्या वाहनाने पाठविण्यात आले. पोलिसांनी वाहनाविरुद्ध फक्त दंड आकारला.
चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या बोराळा येथे सामाजिक न्याय विभागामार्फत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा संस्थेमार्फत चालविण्यात येते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी आहेत. या निवासी आश्रमशाळेत मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या सुटीनिमित्त बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास चारचाकी (एमएच २७ ए ९९१३) वाहनात कोंबून नेले जात असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे व सागर व्यास यांच्या लक्षात येताच त्यांनी अंजनगाव स्टॉपवर वाहन थांबविले आणि पोलिसांना पाचारण केले. आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा येथे भेट दिली. संस्थाचालक व संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
नागरिकांची गर्दी, विद्यार्थी भेदरलेले
अनुदानित आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी मेळघाटच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील असल्याने परतवाड्यापासूनच १०० ते १५० किलोमीटर अंतरापर्यंत १७ प्रवासी संख्या असलेल्या वाहनात ५७ विद्यार्थी कोंबून नेत असल्याने विद्यार्थी भेदरलेले होते. चारच्या आसनावर १५ विद्यार्थी बसल्याचे दिसून आले, तर शिक्षकांची बहाणेबाजी संताप व्यक्त करणारी होती. विद्यार्थी उतरताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या बघ्यांनी एकच गर्दी केली होती. नंतर पोलिसांनी ती पांगविली.
म्हणे, एक वाहन नादुरुस्त झाले
उपस्थित शिक्षकांनी १५ सीटर अन्य वाहन नादुरुस्त झाल्याने अमरावतीला पाठवल्याचे सांगितले. वास्तविक, १७ अधिक १५ असे ३२ होतात, ५७ नव्हे. यामुळे ही बहाणेबाजी संताप व्यक्त करणारी असल्याने अनेकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
'त्या' दोघांचे कौतुक
रहदारीच्या अंजन बस स्टॉपवर कोंबून भरलेले वाहनातील विद्यार्थी यावर सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे यांना दिसताच त्यांनी सागर व्यास यांना सांगून हा प्रकार उघडकीस आणला. रस्त्याने अनेक नागरिक ये-जा करीत होते. त्यांच्या या कार्याचे कौतुक उपस्थित करीत होते.
मोटार वाहन कायद्याप्रमाणे संबंधित वाहनावर अवैध प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
- संदीप चव्हाण, ठाणेदार, परतवाडा