एकाच दिवसाच्या पावसाने बसला ५९ पुलांना तडाखा, चार मार्ग वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 11:43 AM2022-07-26T11:43:32+5:302022-07-26T11:47:00+5:30
२० जुलै रोजी अतिवृष्टी, पुलांच्या अतिआवश्यक कामासाठी ५ कोटींची गरज
अमरावती : २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी, सततच्या पुरामुळे लहान-मोठ्या ५९ पुलांना तडाखा बसला असून कोट्यवधीच्या शासकीय मालमत्तेची हानी झाली आहे. त्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीसह अप्रोच रस्ते अतिआवश्यक दुरुस्तीसाठी ४४ कोटींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून तो राज्य शासनाकडे निधीसाठी पाठविला आहे.
जिल्ह्यात २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे पुलाच्या अतिआवश्यक दुरुस्ती करण्यासाठी पाच कोटी निधी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. एकंदरीत २०० किमी लांबीचे रस्ते अतिवृष्टीने डॅमेज झाले आहेत. त्यापैकी ७ ते ८ किमी लांबीचे रस्ते पूर्णत: डॅमेज झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांना पुलावरुन ये-जा करताना वाहनचालक, नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने चार राज्यमार्ग वाहतुकीसाठी अद्यापही बंद आहे.
लहान, मोठ्या पुलांचे नुकसान
अतिवृष्टी, पुराने जिल्ह्यात लहान-मोठ्या ५९ पुलाचे नुकसान झाले आहे. यात पुलाच्या पुनर्बांधणी महत्त्वाची असणार आहे. पुलाचे संरक्षण कठडे, वाईडींग, पुलाची लांबी-रूंदी, जोडणारे अप्रोच रस्ते यासह राज्य महामार्ग, गावातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती आणि आवश्यकतेनुसार बांधणी पुलाची कामे करण्यात येणार असून,त्यानुसार प्रस्ताव पाठविला आहे. शासनाकडून निधीची तरतूद होताच कामे केली जाईल.
अतिवृष्टीने बंद असलेले चार मार्ग
- शिराळा- डवरगाव (राज्यमार्ग ३०८) ५३७०० किमी
- मोर्शी-सिंभोरा (राज्य मार्ग २९२) ७८०० किमी.
- वलगाव-पांढरी-निंभोरा रस्ता : ४४५०० ते ४५२०० किमी.
- धारणी ते कुसूमकोट (राज्यमार्ग २९२) १४४०० किमी.
७१ घरात पुराचे पाणी, ४४ जण स्थलांतरित
तीन आठवड्यांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. यामध्ये २४ तासांत मोर्शी व अंबाडा मंडळांमध्ये प्रत्येकी ७५ मिमी पावसाची नोंद झाली. ही अतिवृष्टी आहे. ४८ तासांपासून मोर्शी व वरुड तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. वरुड तालुक्यात पुराचे पाणी ७१ घरात शिरले. यामध्ये २० कुटुंबांतील ४४ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
महसूल यंत्रणेद्वारा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये वरुड तालुक्यातील १८ गावांमधील ७१ घरात पुराचे पाणी शिरले व यामुळे १६ कुटुंबातील ४० व्यक्ती व अचलपूर तालुक्यात चार गावांतील चार व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. संततधार पावसाने तिवसा तालुक्यात दोन, धामणगाव तालुक्यात ३९, नांदगाव तालुक्यात पाच, मोर्शी तालुक्यात ७४, वरुड तालुक्यात १३६, दर्यापूर तालुक्यात सहा व चिखलदरा तालुक्यात सात घरांची पडझड झालेली आहे.
२,५५८ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वरुड तालुक्यातील २,५२७ हेक्टर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय धामणगाव तालुक्यातील २१ हेक्टर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टर शेतीपिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.
२० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ४४ कोटी तर, ५९ लहान-मोठे पुलावरून जोरात पाणी वाहून गेल्याने अतिआवश्यक दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
- अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.