२८ ग्रामपंचायतींत ५९.४१ टक्के मतदान, ५० जागा रिक्तच
By जितेंद्र दखने | Published: May 18, 2023 10:46 PM2023-05-18T22:46:20+5:302023-05-18T22:47:12+5:30
९ हजार ३५० मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
जितेंद्र दखने, अमरावती: जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २८ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या ३१ जागांसाठी पोटनिवडणूक १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ३२ मतदान केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये ५९.४१ टक्के मतदान झाले. ९ हजार ३५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.रिंगणात असलेल्या ६४ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. या पाेटनिवडणुकीनंतरही जवळपास ३५ ग्रामपंचायतींमधील ५० जागा उमेदवारी अर्ज न आल्यामुळे रिक्तच आहेत. याशिवाय एक सरपंचपदही उमेदवारी अर्ज नसल्यामुळे रिक्त राहणार आहे.
गत डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाभरात ७५ ग्रामपंचायतींमध्ये २ सरपंच व ११४ सदस्यांची पदे विविध कारणांमुळे रिक्त होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ३३ सदस्य अविरोध निवडून आले, तर ५० ठिकाणी अर्जच दाखल झाले नाहीत. याशिवाय दोन सरपंचपदांपैकी चांदूर बाजार तालुक्यातील सर्फापूर येथे सरपंचपदाची निवडणूक अविरोध झाली आहे. तिवसा तालुक्यातील आखतवाडा येथील थेट सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे २८ ग्रामपंचायतींमध्ये ३१ जागांकरिता ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
यामध्ये १८ मे रोजी ३२ मतदार केंद्रांवर ४ हजार ३५८ महिला व ४ हजार ९९२ पुरुष अशा एकूण ९ हजार ३५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ग्रामपंचायतींसाठी ५९.४१ टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये अंजनगाव बारी, पिंपरी चांदुरी (ता. अमरावती) येथे, सायत (ता. भातकुली), शेंदोळा खु. (ता. तिवसा), वाई (ता. चांदूर रेल्वे), गव्हा निपाणी, जळका पटाचे, तरोडा (ता. धामणगाव रेल्वे), अमडापूर, रोषणखेडा (ता. वरूड), सोनगाव (ता. अंजनगाव सुर्जी), शिंगणवाडी, रूस्तमपूर, लेहेगाव, शिंगणापूर, चंडिकापूर, रामतीर्थ, सासन बु. (ता. दर्यापूर), हरिसाल, कुसुमकोट बु, धूळघाट रेल्वे, सुसर्दा, मांडवा (ता. धारणी), चिचखेड, अंबापाटी, गांगरखेडा, बदनापूर, राहू (ता. चिखलदरा) या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत जिल्हा प्रशासनाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय भरारी पथकाचाही वॉच ठेवण्यात आला होता. दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअर व मतदारासाठी पिण्याचे पाणी अशा प्रकारच्या आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी होणार मतमोजणी
२८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवार १९ मे रोजी सकाळी १० पासून सुरू होणार आहे. भातकुली वगळता इतर सर्व ठिकाणी मतमोजणी तहसील कार्यालयात होईल. भातकुली तालुक्यातील मतमोजणी अमरावती येथील जुने भातकुली तहसील कार्यालयात होईल.