वऱ्हाडातील ३८ तालुके सरासरीच्या दूरच, यवतमाळ, वाशिम जिल्हा माघारला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 07:41 PM2019-08-05T19:41:13+5:302019-08-05T19:41:42+5:30
पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले.
- प्रदीप भाकरे
अमरावती - पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले. मात्र, मान्सूनचे ६५ दिवस उलटत असताना पश्चिम विदर्भातील तब्बल ३८ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झालेली नाही. १ जून ते ५ आॅगस्ट या कालावधीत अपेक्षित असलेल्या पावसाच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात ९४ टक्के, अकोल्यात १०१.४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात केवळ ६२.२ टक्के, बुलडाण्यात १०६.१ टक्के, तर वाशिम जिल्ह्यात केवळ ६६.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. एकूण ५६ तालुक्यांपैकी केवळ १८ तालुक्यांनी सरासरी गाठली.
अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, धारणी व चिखलदरा हे सहा तालुके, अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा व बाळापूर हे चार तालुके, बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या आठ अशा एकूण १८ तालुक्यांमध्ये सरासरी पावसाने शंभरी गाठली आहे. अर्थात १ जूनपासून ते ५ आॅगस्ट या कालावधीत अपेक्षित असलेल्या पावसाची तेथे शतप्रतिशत नोंद झाली आहे. अन्य ३८ तालुके दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यवतमाळ आणि वाशिममधील एकाही तालुक्याने सरासरी गाठली नाही.
वार्षिक पर्जन्यमानाच्या ४८ टक्के पाऊस
जून ते ३० सप्टेबर हा मान्सूनचा कालावधी समजला जातो. या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात सरासरी ७७७.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ६५ दिवसांमध्ये ४८.७ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात ५२.८, अकोल्यात ५७.६, यवतमाळमध्ये ३५.७, बुलडाणा जिल्ह्यात ५९.३ व वाशिम जिल्ह्यात ३८ टक्के पावसाची नोंद झाली.