लोकसहभागातून खोदल्या ६० बोअरवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:26 AM2019-05-26T01:26:33+5:302019-05-26T01:27:29+5:30
गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे. लोकसहभागातून काय करणे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण शिंदीवासीयांनी समाजासमोर ठेवले आहे.
अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या आठ हजार लोकसंख्येच्या गावात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तीनही बोअरवेलची पाणी पातळी खोल गेली आहे. मागील काही वर्षांपासून ही पाणी समस्या कायम आहे. यातून मार्ग काढण्याकरिता गावकरी स्वत: पुढे आलेत. १० ते १५ लोकांचा एक गट या प्रमाणे त्यांनी गट केलेत. प्रत्येक गटाने बोअरवेलकरिता आपसात स्वतंत्र वर्गणी केली. बोअरवेल पूर्ण करून घराघरांत पाणी घेताना येणारा खर्च वाटून घेतला.
तीन ते चार वर्षांपासून या गटनिर्मितीतून बोअरवेल निर्मितीच्या प्रक्रियेने शिंदी बु. मध्ये वेग पकडला. यातून ५ हजार लोक आत्मियतेने जुळले गेले. ज्यांच्याकडे जागा असेल त्यांच्या अंगणात आणि ज्या गटाकडे जागा नसेल त्यांनी रस्त्याच्या कडेला घराशेजारी सामूहिक बोअरवेल घेतल्या आहेत.
अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे लोकसहभागातील ६० बोअरवेल आहेत. यात सरासरी १५ लोकांच्या एका गटाने एका बोअरवेलची निर्मिती केली. गावातील ६० बोअरवेलने गावातील पाच हजाराहून अधिक लोकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.
पाणी वापर संहिता
पाणीटंचाईवर मात करण्यारिता लोकसभागातून ग्रामस्थांनी बोअरवेल खोदून पाणी उपलब्ध करून घेतले असते. परंतु या बोअरवेलचे पाणी वापरण्याकरिता त्यांनी स्वत: पाणी वापर संहिता अंगिकारली आहे. यात गरजेपूरताच पाण्याचा वापर करत आहेत. ठरल्याप्रमाणे आठवड्यातून ते एकदिवस, कोरडा दिवसही पाळत आहेत.
उत्कृष्ट व्यवस्थापन
गटागटाने निर्मित या बोअरवेलचे व्यवस्थापन सामंजस्य व गरजेवर आधारित आहे. गटात सहभागी प्रत्येकाच्या घरी त्या बोअरवेलचा केबल आणि कॉकसह पाईप देण्यात आला. ज्याला पाण्याची गरज आहे, तो घरूनच बोअरवेलची बटन दाबतो. बोअरवेल सुरु करून पाणी घेतो. पाणी भरणे झाले की कॉक, बटन बंद करतो. यासाठी वेळ आणि दिवसही वाटून घेतले आहेत. वीज केबल प्रत्येकाच्या मीटरपर्यंत गेल्यामुळे वीज बिलाचाही प्रश्न नाही. वापरानुसार रक्कम वीजदेयकात समाविष्ट होत आहे.