६० कोटींचे दुष्काळी अनुदान वाटप बाकी
By admin | Published: March 17, 2017 12:16 AM2017-03-17T00:16:08+5:302017-03-17T00:16:08+5:30
खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी
खरीप २०१५ साठी मदत : चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के वाटप
अमरावती : खरीप २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई स्थितीची भरपाई करण्यासाठी शासनाने कपाशी व सोयाबीन पिकांचा विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये १०९ कोटी उपलब्ध केले. मात्र यापैकी ६० कोटीचा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला नाही.
अमरावती जिल्ह्यात पीक विमा न काढलेल्या एक लाख ९६ हजार ९०८ कपाशी व सोयाबीन उत्पादकांसाठी दोन लाख ४७ हजार ८९६ क्षेत्रासाठी १०९ कोटी ३६ लाख रुपये १० जानेवारीला वितरित केले होते. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितींची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महसूलची यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे निधी वाटप रखडले. मात्र या आठवड्यात हा दुष्काळ निधी वाटपाचा वेग वाढला आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६५ हजार ४१७ शेतकऱ्यांना ३९ हजार ८० हेक्टर क्षेत्रासाठी ४९ कोटी ९४ लाख ३३ हजार ५०६ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७२४७ शेतकऱ्यांना ५ कोटी १४ लाख ८० हजार, भातकुली ६५१२ शेतकऱ्यांना ३ कोटी ३७ लाख ८८ हजार, तिवसा ५०१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३७ लाख ९३ हजार, नांदगाव ८९५६ शेतकऱ्यांना ६ कोटी ४८ लाख ३० हजार, चांदूररेल्वे ५२९६ शेतकऱ्यांना ७ कोटी ७० लाख, धामणगाव ४६१९ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख, मोर्शी ५६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४५ लाख, वरूड ४६७ शेतकऱ्यांना १८ लाख ७१ हजार, अचलपूर २८६० शेतकऱ्यांना २ कोटी ५६ लाख ७६ हजार, चांदूरबाजार ३९७८ शेतकऱ्यांना २ कोटी १४ लाख १२ हजार, दर्यापूर ३६५९ शेतकऱ्यांना २ कोटी ४ लाख ३१ हजार, अंजनगाव सुर्जी २९८७ शेतकऱ्यांना ४ कोटी ६२ लाख ५८ हजार, धारणी ४२८७ शेतकऱ्यांना २ कोटी ६ लाख १९ हजार व चिखलदरा तालुक्यात ३९१८ शेतकऱ्यांना २ कोटी ४१ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
अनुदान वाटपाचा ४५.६६ टक्का
सद्यस्थितीत अनुदान वाटपाचा टक्का ४५.६६ आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात १०० टक्के अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. अमरावती तालुक्यात ३९ टक्के, भातकुली २६, तिवसा ६२, नांदगाव ३७, चांदूररेल्वे ६३, धामणगाव २८, मोर्शी ५६, वरूड ५१, अचलपूर ६२, दर्यापूर ४५.१३, अंजनगाव सुर्जी ७७, धारणी २७ व चिखलदरा तालुक्यात ४७ टक्के वाटप करण्यात आले आहे.