कपाशीला हेक्टरी ६० हजार, सोयाबीनला मिळणार ५१ हजार; खरीप पीक कर्ज वाटपाचे पीकनिहाय दर निश्चित
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 3, 2024 10:17 PM2024-05-03T22:17:42+5:302024-05-03T22:18:08+5:30
यंदाचा खरीप हंगाम महिन्याभरावर आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त आहे.
अमरावती : आर्थिक संकटात असल्याने शेतकऱ्यांना खरिपाच्या पीक कर्जाचा मोठा आधार मिळतो. यंदा पीक कर्ज देण्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स समितीने (डीएलबीसी) पीकनिहाय हेक्टरी कर्ज वाटपाचे दर जाहीर केले आहे. यानुसार कपाशीला किमान ६०,५०० तर सोयाबीन पिकाला ५०,८३० रुपये हेक्टरी कर्ज मिळणार आहे.
यंदाचा खरीप हंगाम महिन्याभरावर आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त आहे. यानंतर पीक पेरणीसाठी त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता असते. अशा वेळेस त्यांना बँकांद्वारे कर्ज देण्यात येते. १२ महिन्यात परतफेड केल्यास यावरील व्याज त्याच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
जिल्हा बँकेचे पीक कर्ज सेवा सहकारी सोसायटीमार्फत तर राष्ट्रीयीकृत बँका थेट शेतकऱ्यांना कर्जवाटप करतात. यासाठी बँकांना राज्यस्तरीय बँकर्स समितीने (एसएलबीसी) लक्ष्यांक निश्चित केलेला आहे. यामध्ये ५ ते १० टक्क्यापर्यंत कमी-अधिक करीत जिल्हास्तरीय बँकर्स समितीने (डीएलबीसी) जिल्ह्यातील बँकांना टार्गेट दिलेले आहे. व यासाठी पीक कर्ज वाटपाचे दरदेखील निश्चित केलेले आहे. त्यामुळे बँकांनी खरिपासाठी लवकर कर्जपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
असे आहेत हेक्टरी कर्ज वाटपाचे दर
कपाशी (जि) : ६०५०० ते ६३५२५
ज्वारी (सं) : २९९६० ते ३१९७०
तूर : ४१५८० ते ४३५६०
सोयाबीन : ५०८३० ते ६१२१५
मूग : २४२०० ते २५४१०
उडीद : २४२०० ते २५४१०
गहू, हरभरा, करडईसाठी दर निश्चित
पीक कर्ज वाटपासाठी गव्हाला हेक्टरी ४४२०० ते ४६२००, हरभऱ्याला ३१६८० ते ४३८९० हरभरा (बा.) ३८२८० ते ४८५१०, कांदा ६६६७५ ते ७४९७०, भुईमूग (ख) ३६३२० ते ४२९९०, मिरची : ६६६७५ ते ८५९९५, संत्रा-मोसंबी १०५६०० ते ११६१६०, केळी १०५००० ते ११०२५० या दरम्यान हेक्टरी पीक कर्ज खरीप हंगामासाठी मिळणार आहेत.