म्युकरमायकोसिसचे ६०६ रुग्ण, ५२ मृत्यू,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:48+5:302021-07-22T04:09:48+5:30
गजानन मोहोड अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पोस्ट कोविड आजारांचा ग्राफ आता काहीसा माघारला आहे. या चार ...
गजानन मोहोड
अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पोस्ट कोविड आजारांचा ग्राफ आता काहीसा माघारला आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत म्युकर मायकोसिस या बुरशीच्या आजाराचे ६०६ रुग्ण नोंदविले गेले आहेत. याशिवाय ५२ रुग्णांचा या आजाराने बळी घेतला, तर १०० हून अधिक नागरिकांना अवयव गमवावे लागल्याचे वास्तव आहे.
विभागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. हा कहर मे महिन्यापर्यंत सुरू होता. या काळात अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रेमेडेसिविर इंजेक्शन, स्टेराॅईडचा अतिरेक व चुकीच्या पद्धतीने वापर झाल्याने अनेक रुग्णांना याचे दुष्परिणाम कोरोनापश्चातही भोगावे लागत आहेत. या पोस्ट कोविड आजारांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांची एप्रिल दरम्यान नोंद व्हायला लागली. यामध्ये अनेकांना या आजाराने आतापर्यंत ५२ रुग्णांना जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक २२ रुग्ण अमरावती जिल्ह्यातील आहे. याशिवाय ५० वर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. या आजारावरील इंजेक्शन अम्फोटेरेसीन बी, आयट्राकोनॅझोल, फ्युकोनॅझोल आदी औषधांचा तुटवडा पडू लागल्याने यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
सद्यस्थितीत विभागात अम्फोटेरेसिन बी इंजेक्शन (प्लेन) १,३००, अम्फोटेरेसिन बी इंजेक्शन (लिम्फोसोमल) २७,८५०, अम्फोटेरेसिन बी इंजेक्शन (इमल्शन) ३,५५०, अम्फोटेरेसिन बी इंजेक्शन (लिपिड कॉप्लेक्स) १,१०० व पोरकॅनाझोल इंजेक्शचा १,५९५ साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रोसाकॅनाझोल टॅबलेट ३९,०७०, सस्पेंशन २२,३०० आदींचा साठा असल्याची माहिती आहे.
बाॅक्स
म्युकरमायकोसिसची जिल्हा स्थिती
जिल्हा रुग्णसंख्या मृत्यू उपचार सुरू डिस्चार्ज
अकोला १९७ १५ ८१ ९३
अमरावती २४० २२ ८५ १२९
बुलडाणा ६३ ०५ ०० ५८
वाशिम २५ ०४ ०२ ०९
यवतमाळ ८१ ०६ ०५ ६३
बॉक्स
या व्यक्तींना आजाराचा अधिक धोका
अनियंत्रित मधुमेह व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांच्या शरीरात या बुरशीचा प्रवेश होतो. नाकातून घशात, त्यानंतर जबडा, दातानंतर डोळ्यांतही पसरते. शरीराच्या ज्या भागात बुरशीचा शिरकाव होतो, तो भाग नष्ट करावा लागतो. प्राथमिक अवस्थेत खबरदारी घेतल्यास हा आजार बरा होतो. डोके दुखणे, चेहऱ्यावर सूज येणे, ताप तोडांला फोड, त्यात पू होणे, दात हलणे आदी या आजाराची लक्षणे आहेत.