निवृत्त प्राध्यापकाला तब्बल ६१.७४ लाख रुपयांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:49 PM2024-10-07T13:49:43+5:302024-10-07T13:50:58+5:30
डिजिटल अरेस्ट : मनी लाँड्रिंगचे पैसे आले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील निवृत्त प्राध्यापकाला चौकशी व अटकेची भीती दाखवत चक्क ६१ लाख ७४ हजार रुपयांना गंडविण्यात आले. सध्या राज्यात सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट' या नावाने नवीन शक्कल लढवली आहे. स्वतःला सीबीआय, पोलिस, ईडी किंवा लष्करी अधिकारी असल्याचे सांगून गुन्हेगार नागरिकांना व्हिडीओ कॉल करतात. संबंधित व्यक्तीला 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करतात तसेच डेबिट कार्डचा पासवर्ड विचारून त्यांचे बँकेतील खाते रिकामे करतात
३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० अशा साडेतीन तासात आरोपींनी त्या निवृत्त प्राध्यापकाला ६१.७४ लाख रुपये आरटीजीएस करण्यास भाग पाडले. त्यापूर्वी सावळा येथील त्या वृद्धाला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल गेला. ५३८ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी काही रक्कम आपल्या खात्यात टाकली. आपण त्याची चौकशी करीत आहोत. त्यासाठी मुंबईला हजर राहा, असे त्यांना बजावण्यात आले. त्यांनी नकार दिला तेव्हा ती रक्कम आरटीजीएस करा, चौकशीअंती आम्ही ती परत करू, अशी बतावणी केली. सायबर भामट्यांनी कुटुंबीयांच्या शेअर्स व बँक खात्यांची माहिती मिळविली. त्यानंतर रक्कम खात्यातून ऑनलाईनच काढली गेली.
निवृत्त अधिकारी- कर्मचारी, वृद्ध व्यापारी लक्ष्य
'डिजिटल अरेस्ट' सायबर क्राईम म्हणून अलीकडे झपाट्याने होणाऱ्या प्रकाराबाबत उच्चशिक्षित तरुण किंवा तरुणी कायदे आणि नियमांबाबत माहिती ठेवून असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार 'डिजिटल अरेस्टची क्लुप्ती सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी किंवा वृद्ध व्यापारी यांच्यावर वापरतात. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान किंवा कायदेशीर तरतुदींबाबत अनेकदा पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक करणे सोपे जाते. ही बाब हेरून सायबर गुन्हेगार त्यांना निवडतात. सध्या त्यांच्या रडारवर अशाच प्रकारचे लोक आहेत.
"सावळा येथील निवृत्त प्राध्यापकाची झालेली आर्थिक फसवणूक हा 'डिजिटल अरेस्ट' मध्ये मोडणारा सायबर क्राईम आहे. सायबर गुन्हेगाराचा व्हिडीओ कॉल आल्यानंतर न केलेल्या गुन्ह्यांत अडकण्याची भीती बाळगू नये."
- गिरीश ताथोड, ठाणेदार, दत्तापूर