सिंभोरा धरणस्थळी ६३ स्थलांतरित पक्षी
By admin | Published: December 30, 2015 01:26 AM2015-12-30T01:26:36+5:302015-12-30T01:26:36+5:30
मोर्शीलगतच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा प्रकल्प परिसरात ६३ पेक्षा अधिक प्रजातींचे विदेशी पक्षी आढळून आले आहेत.
‘ग्रे लॅग गुज’ची नोंद : पक्षी मित्रांचा पुढाकार, जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन
अमरावती : मोर्शीलगतच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा प्रकल्प परिसरात ६३ पेक्षा अधिक प्रजातींचे विदेशी पक्षी आढळून आले आहेत. दरवर्षी हिवाळा ऋतू सुरू होताच अमरावती जलसाठ्यावर मोठ्या संख्येने विदेशी पक्षी येण्यास सुरूवात होते.
या विदेशी पक्ष्यांचा अभ्यास त्याचे निरीक्षण नोंदविण्यासाठी मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि निसर्गमित्र मंडळीच्या विद्यार्थ्यांनी सिंभोरा धरणावर कूच केले. विशेष म्हणजे ६० हून अधिक विविध प्रजातींचे मोठ्या संख्येने जलसाठ्यावर येतात. त्यातील थोडेच विदेशी पक्षी आपल्याकडील जलसाठ्यांवर १ ते ४ महिने आश्रयाला येतात. उर्वरित काहीच दिवस येथे विश्रांती घेऊन पुढल्या प्रवासाला सुरूवात करतात.
या एकदिवसीय अभ्यास दौऱ्यात ६३ विविध पक्ष्यांचा नोंदी घेण्यात आल्या. यात ब्राउन हेडेड गल, पलास गल, केंटीश फ्लोवर, स्मॉल प्रिटीन्कॉल, ग्रेट पेटेंड स्राईप, सुरेशियन स्पून बिल, चेस्टनट बेलीड सॅन्ड ग्राडूज, फ्रिजंट टेल्ड जकाना, ग्रे हैरान, लिटील ग्रिब, कुली स्टॉर्क, ओपन बिलस्टार्क, ओस्प्रे, इंडियन स्किमरसह नुकताच केकतपूर तलावावर नोंदविल्या गेलेला ग्रे लॅग गुज याची पहिल्यादाच १५ पेक्षा अधिक संख्येने सिंभोरा परिसरात नोंद घेण्यात आली.
एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने आढळून आलेली अमरावती परिसरातील ही नोंद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. (प्रतिनिधी)
बाभळीच्या खुरट्या जंगलात
सिंभोरा धरणाला लागून असलेल्या बाभळीच्या खुरट्या जंगलात ब्लॅक हेडेड ओरिओल, गोल्डन ओरीआॅल, इंडियन पिट्टा, रुफस ट्रीपाय, ब्लॅक रेड स्टार्ट, आॅरेंज हेडेट थ्रश, इंडियन ग्रे हार्नविल, सरकीर मालकोश यासारख्या महत्त्वपूर्ण पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात पक्षी अभ्यासकांना यश आले आहे.
विद्यार्थ्यांनी घेतला अभूतपूर्व अनुभव
मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि निसर्गमित्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सिंभोरा धरणावर पक्ष्यांचा स्थलांतरणाचा अभूतपूर्व अनुभव घेतला. या भागात हिवाळ्याच्या दिवसांत विदेशी पक्ष्यांचे नियमित आगमण होताना आढळते.
पक्षी संरक्षण,
संवर्धनासाठी प्रयत्न
पर्यावरणामध्ये पक्षी जीवनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न कसे वाढविता येईल, याकरिता हा अभ्यास दौरा असल्याचे पक्षिमित्र तथा भारतीय विद्यालय, मोर्शी भूगोल विभागाप्रमुख सावन देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.