६३ हजारांवर शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: February 7, 2024 09:27 PM2024-02-07T21:27:10+5:302024-02-07T21:27:27+5:30
नापिकीने ओढावले संकट : ६८ कोटींचे कर्ज, अवैध सावकारी कित्येक पट
गजानन मोहोड/ अमरावती : अस्मानी, सुल्तानी संकटाचे सत्र शेतकऱ्यांच्या मागे हात धुऊन लागले आहे. पावसाच्या तुटीने खरीप अन् रब्बीचा हंगाम संकटात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावकारांच्या दारी जावे लागत आहे. यंदाच्या नऊ महिन्यांत परवानाधारक ६०२ सावकारांनी ६३,०६३ कर्जदारांना ६७.४४ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. यापेक्षा कित्येक पट कर्ज अवैध सावकारांनी वाटले आहे.
दोन वर्षांत बँकांनी उच्चांकी कर्जवाटप केलेले आहे. मात्र, निसर्गाची साथ नसल्याने शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे बँकांद्वारे कर्जवाटप होत नसल्याने शेतकऱ्यांनी दागिने, प्लॉट, घर, शेती तारण ठेवून सावकारांकडून कर्ज घेतले आहे. अलीकडे अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. त्यांच्याद्वारे दामदुप्पट दराने कर्जवाटप होत आहे. अगदी तीन, पाच टक्के महिना या दराने व त्यामध्ये चक्रवाढ व्याजाची आकारणी होत असल्याने या विळख्यात शेतकरी गुरफटला जात आहे.