एसटीचे ६४ कर्मचारी बडतर्फ, आंदोलन सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 06:36 PM2022-01-05T18:36:04+5:302022-01-05T18:40:59+5:30
४ जानेवारी रोजी ४६ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा बुधवारी ५ आगारासह विभागीय कार्यालयातील ६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
अमरावती : वारंवार सूचना देऊनही कामावर हजर न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवारी पुन्हा ६४ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर अमरावती विभागीय कार्यालयाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. ४ जानेवारी रोजी ४६ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा बुधवारी ५ आगारासह विभागीय कार्यालयातील ६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये २० चालक, ३० वाहक, ५ यांत्रिकी आणि ९ प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत १८० कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानंतरसुद्धा कामावर रुजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रथम टप्प्यात नोटीस देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसमोर अडचणी आणखी वाढल्या आहेत. जिल्ह्यात केवळ मोर्शी, अमरावती, वरूड वगळता अन्य कोठेही बसफेऱ्या सुरू नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अद्यापही खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बडतर्फीची कारवाई नंतरसुद्धा कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास नकार दिला असून, एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका स्थानिक कामगारांनी घेतली आहे.
आतापर्यंत १८० जण बडतर्फ
गत काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर हजर होण्याबाबत सूचना देऊन हजर होत नसल्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत २७० जणांना निलंबित केले आहे. ६ जणांची सेवा समाप्त केली असून १८० एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ करण्यात आले आहे. बुधवार ५ जानेवारी रोजी बडनेरा आगारातील १०, पतरवाडा ९, दर्यापूर ९, चांदूर रेल्वे ८, चांदूर बाजार १९ आणि विभागीय कार्यालयातील ९ अशा ६४ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.