अखेरच्या दिवशी जिल्हा बॅंकेसाठी ६५ नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:17 AM2021-09-07T04:17:14+5:302021-09-07T04:17:14+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक पदासाठी गत ३१ ऑगस्टपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक पदासाठी गत ३१ ऑगस्टपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी ६५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे नामांकनाची संख्याही १८३वर पोहोचली आहे. आता ७ सप्टेंबर राेजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्याचा ६ सप्टेंबर अखेरचा दिवस होता. बहुतेक राजकीय पक्षांच्या धुरिणांसह संचालक मंडळातील इच्छुकांनी या निवडणुकीत उडी घेतली असून, पाच दिवसात १८३ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा बँकेसाठी होत असलेल्या संचालक पदासाठी सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४, एससी-एसटी, ओबीसी आणि व्हीजेएनटी या मतदारसंघातून प्रत्येकी एक याप्रमाणे ३, महिला संवर्गातून २ आणि इतर शेती संस्था तसेच नागरी सहकारी बँका संवर्गातून प्रत्येकी एक याप्रमाणे दोन अशाप्रकारे एकूण २१ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी ३१ अधिसूचना घोषित होऊन त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले होते. पहिल्या दिवशी कुणीही अर्ज दाखल केला नव्हता. परंतु नंतरच्या चार दिवसात १८३ अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार ७ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार असून, दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला छाननी अंतिम अर्जाची यादी घोषित केली जाणार आहे. त्याच दिवसापासून निवडणुकीतून माघार घेणे सुरू होईल. २२ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर २३ सप्टेंबरला चिन्हवाटप केले जाणार असून, ४ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ५ ऑक्टोबरला मतदान मोजणी होईल.
बॉक्स
अखेरच्या दिवशी यांचे नामांकन दाखल
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, र.कॉं.चे संजय खोडके, भाजपच्या निवेदिता चौधरी, सुधाकर भारसाकळे, जि.प. सभापती पूजा आमले, रामेश्वर अभ्यंकर, जि.प. विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, चंद्रशेखर, शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी, सपाटे, प्रकाश काळबांडे, प्रवीण काशीकर, अशोक रोडे, संजय वानखडे, शारदा ठाकरे, पुष्पा शिंगणे, ज्ञानेश्वर दाभाडे, दुर्गाप्रसाद मिश्रा, अभिजित हरणे, प्रतिभा कठाळे, वासुदेव सुरजुसे, संजय वानखडे, जयंत देशमखु, रावसाहेब वाटाणे, परिक्षित पाटील, अरुणा गावंडे, सुधाकर तलवारे, दीपक कोरपे, संजय वै. देशमुख, प्रताप भुयार, चित्रा डहाणे, जयश्री राजेंद्र देशमुख, श्रीकांत देशमुख, प्रमोद सांगोले, मिलिंद तायडे, वदंना चौधरी, प्रवीण सवाई, शिवाजी बंड, अजय पाटील, राजेंद्र रोडगे, भाेजराज काळबांडे, प्रियंका घुलक्षे, रंजित चित्रकार, वैशाली राणे, सुभाष मनवर, राजेंद्र महल्ले आदींचा समावेश आहे.