६५ पैसेवारीत जिल्ह्याची पीकस्थिती नजरअंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:27 PM2018-10-01T22:27:58+5:302018-10-01T22:28:22+5:30
यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्तवादी चित्र नाही. त्यामुळे ‘हेच का अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जिल्ह्यात १,९८५ गावामधील खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ३० सप्टेंबरला जाहीर केली. यंदाच्या खरिप हंगामात केवळ नांदगाव खंडेश्वर वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. जिल्ह्यात सरासरी १८१ मिमी पावसाची तूट आहे. मृग नक्षत्रानंतर जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे पिकांची वाढदेखील समाधानकारक झाली. मात्र, सोयाबीवर चक्रीभृंगा, खोडमाशी सह विषानूजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर १० आॅगस्टपासून तब्बल ४५ दिवस पावसात खंड असल्यामुळे सोयाबीन जाग्यावरच विरले. सोयाबीनला फुलोऱ्यावर व शेंगा भरत असताना पावसाची अत्यंत गरज असते. यावर्षी पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या. यामुळे सरासरी उत्पादनात किमान ४० टक्के घट येणार आहे. वास्तविकता यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या ७.२८ लाख पेरणीक्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे ३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. सद्यस्थितीत २ लाख हेक्टरवरील सोयाबीन बाधित असताना खरिपाची नजरअंदाज ६५ पैसेवारीत जिल्ह्याची वस्तुस्थिती नजर अंदाज केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांत अन्याय झाल्याची भावना
कमी पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली होती. मात्र, २१ व २२ सप्टेंबरला आलेल्या पावसामुळे तुरीला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या पैसेवारीमध्ये तूर पिकाची गणना होत नाही. ते पैसेवारीसाठी रबी पीक आहे. कपाशीवर यंदाही बोंडअळीचा अटॅक झालेला आहे. तसेच अपुऱ्या पावसामुळे मूग व उडीद पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याची भावना आहे.
तालुकानिहाय नजरअंदाज पैसेवारी
जिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात १४४ गावांत ६३ पैसे, भातकुली १३७ गावांत ६७, तिवसा ९५ गावांत ५९, चांदूर रेल्वे ९३ गावांत ५८, धामणगाव रेल्वे ११२ गावांत ६६, नांदगाव खंडेश्वर १६१ गावांत ६६, मोर्शी १५६ गावांत ६१, वरूड १४० गावांत ६८, अचलपूर १८४ गावांत ६८, चांदूरबाजार १७० गावांत ६०, दर्यापूर १५० गावांत ६७, अंजनगाव सुर्जी १२७ गावांत ६९, धारणी १५३ गावांत ६७, तर चिखलदरा तालुक्यात १६३ गावांत ६७ पैसे नजरअंदाज जाहीर करण्यात आलेली आहे.