विठुमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी बसेस
By admin | Published: June 29, 2014 11:41 PM2014-06-29T23:41:28+5:302014-06-29T23:41:28+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याकरिता ५ ते १५ जुलैदरम्यान अमरावती बसस्थानकाहून विठूमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी गाड्या सज्ज झाल्या आहे.
अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याकरिता ५ ते १५ जुलैदरम्यान अमरावती बसस्थानकाहून विठूमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी गाड्या सज्ज झाल्या आहे. यामधून हजारो भाविक अमरावतीहून पढंरपूरसाठी रवाना होणार आहेत.
पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठूमाऊलीच्या दर्शनाकरिता देशभरातील लाखो नागरिक जातात. त्याकरिता रेल्वे व एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. यावर्षीसुद्धा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांसाठी प्रवासाची विशेष सुविधा करण्यात आली आहे. त्याकरिता महामंडळाच्या ६५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. ९ जुलै आषाढी पौर्णिमेला पंढरपूर येथे भाविकांचा जनसागर उसळतो. त्यानिमित्तानेच अमरावती जिल्ह्यातील हजारो भाविक पंढरपूरला जातात. जिल्ह्यातील बडनेरातून २२, परतवाडा ७, मोर्शी ७, वरुड ५, चांदूररेल्वे ६, चांदूरबाजार ७, दर्यापूर ६ याप्रकारे जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. मागील वर्षात ५९ जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यानुसार २३ लाखांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले होते. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा ३० लाखांचे 'टार्गेट' महामडंळाने ठेवले आहे. त्यादृष्टीने आगार व्यवस्थापक प्रयत्न करीत आहे. पंढरपूर यात्रेकरिता प्रवासीभाडे निर्धारित करण्यात आले आहे. त्यामध्ये अमरावती- पंढरपूर वाशिममार्गे जाणाऱ्या गाडीसाठी ५८३ रुपये, दर्यापूर-पंढरपूर मूर्तीजापूर मार्गाने जाण्याकरिता ५७० रुपये, परतवाडा-पढरंपूरसाठी ६३९ रुपये, वरुड- पंढरपूरसाठी ६७६ रुपये, चांदुररेल्वे-पंढरपूरसाठी ६१४ रुपये, मोर्शी-पंढरपूरसाठी ६३९ तर चांदूरबाजार -पंढरपूरसाठी ६२६ रुपये प्रमाणे भाडे ठरविण्यात आले आहे.