अधिग्रहित विहिरींच्या पाण्यावर ६५ गावांची भागविली जाते तहान
By जितेंद्र दखने | Published: May 15, 2024 09:11 PM2024-05-15T21:11:26+5:302024-05-15T21:11:37+5:30
२९ बोअरवेल, ४९ खासगी विहिरींचा समावेश : दहा गावात टॅंकर
अमरावती: जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी १० पाणीटंचाईग्रस्त ६५ गावांतील नागरिकांची तहान अधिग्रहित करण्यात आलेल्या ४९ विहिरी आणि २९ बोअरवेलच्या पाण्यावर भागविली जात आहे. संबंधित गावातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत येत्या ३० जूनपर्यंत विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
नांदगाव खंडेश्वर, मोर्शी आणि चिखलदरा या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विविध गावात सध्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचीटंचाई निवारणासाठी संबंधित तहसीलदारांकडून बोअरवेल व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींमधून जलवाहिनीद्वारे वरील गावांतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा!
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला सलोना, खडीमल, मोथा, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, आलाडोह आणि लवादा या १० गावांना सद्यस्थितीत १३ टँकरद्वारे सुमारे ७ हजार ९९० नागरिकांची तहान भागविली जात आहे.
-----------------------------
तालुकानिहाय विहीर अधिग्रहण संख्या
तालुका-गावे-बोअरवेल-खासगी विहिरी
अमरावती-०६-०१.०७
तिवसा-०४-०१-०२
भातकुली-०१-००-०१
चांदूर रेल्वे-०३-००-०३
नांदगाव खंडेश्वर-१६-००-१७
अचलपूर-०३-०७-०३
मोर्शी-१३-०४-११
वरूड-०२-००-०२
धारणी-०३-०४-००
चिखलदरा-१२-१४-०३
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात आजघडीला १४ पैकी १० तालुक्यांमध्ये ६५ गावांमध्ये बोअरवेल, खासगी विहिरी अधिग्रहीत करून नागरिकांनी पाणीपुरवठा केला जात आहे. दाेन तालुक्यांतील १० गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे.
- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, अमरावती