६६ जणांना अतिसाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:26 PM2018-05-09T22:26:52+5:302018-05-09T22:27:59+5:30

तालुक्यातील सोनापूर येथे मंगळवारपासून दूषित पाण्यामुळे जवळपास ६६ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यात पाच चिमुकल्यांचाही समावेश आहे. चार रुग्ण गंभीर असल्याची माहिती आहे.

66 people with diarrhea infection | ६६ जणांना अतिसाराची लागण

६६ जणांना अतिसाराची लागण

Next
ठळक मुद्देसोनापूर येथे दूषित पाण्याचा पुरवठा : चार गंभीर; वेळीच टँकर न पुरविण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील सोनापूर येथे मंगळवारपासून दूषित पाण्यामुळे जवळपास ६६ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यात पाच चिमुकल्यांचाही समावेश आहे. चार रुग्ण गंभीर असल्याची माहिती आहे. रुग्णांवर येथील जिल्हा परिषद शाळेत उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाने वेळीच टँकर सुरू न केल्याने आदिवासींनी नदी-नाल्याच्या गढूळ पाण्यावर तहान भागविली. यामुळे गावात साथीचा उद्रेक झाला. यामुळे आदिवासींनी प्रचंड संताप व्यक्त केला.
सोनापूर येथे गत महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सदस्यांसह गावकऱ्यांनी पाण्याचे स्रोत उपसण्यासाठी सचिव गजानन चव्हाण यांना वारंवार मागणी केली. मात्र, सचिवाने कुठलेही सहकार्य केले नसल्याचा आरोप आदिवासींनी केला. परिणामी आदिवासींना नदी-नाल्याचे दूषित पाणी त्यांना प्यावे लागले. यामुळे मोठ्या प्रमाणात ओकारी, हगवणीची साथ झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य दिलीप गाठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आरोग्य सेवेचा बोजवारा
अतिसाराची लागण झालेल्यांपैकी रुग्णांमध्ये शालिनी कासदेकर (२), रागिणी सरागे (१), रेखा भुसुम (३), नवनीत कासदेकर (५), यश काळे (५) या चिमुकल्यांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जासू बेलसरे, नीलेश बेलसरेसह अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित रुग्णांवर येथील जि.प. शाळेतच टेंब्रुसोंडा पीएससीचे वैद्यकीय अधिकारी अमोल गिते, रोहन गिते उपचार करीत आहेत. येथे शेवंती हरसुले, कांता दांडेकर, जगन हरसुले, श्रीहरी दहीकर, आकाश बेलसरे, जासी बेलसरे, गीता कास्देकर, संगीता अखंडे, बबीता बेलसरे, नंदा कास्देकर, राम बेलसरे, नावी कास्देकर, नयन बेलसरे, केवलदास कास्देकर, गौरी आठवले, ऋषभ अमरसिंह, सुखिया हरसुले, जिजी हरसुले, ईश्वर बेलसरे, सुनील अखंडे, सविता मावस्कर, बलू मावस्कर, रेखा राजेश दहीकर, गीता ज्ञानेश्वर कास्देकर आदी रुग्णांचा समावेश आहे.
मेळघाटात अन्य गावांनाही साथरोगाचा धोका
अमरावती : सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असताना, दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोगाचा फैलाव होत आहे. साथरोगासंदर्भात सद्यस्थिती व उपाययोजना काय आहेत, असा मुद्दा बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीत शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी उपस्थित केला. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी मेळघाटातील पाणीटंचाईवर तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास मेळघाटात साथरोगाचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. चिखलदरा तालुक्यात सोनापूर येथे साथरोगाची लागण झाली आहे, शिवाय तिवसा तालुक्यातील धारवाडा येथील दुर्गवाडा येथून पाणीपुरवठा करणारी पाइप लाइन फुटल्याने दूषित पाणी पिण्यामुळे धारवाडा येथे साथरोगाची लागण झाली. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
२० लाखांची तरतूद करा : रवींद्र मुंदे
साथरोगाची वाढती लागण लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. साथरोगाचा फै लाव वाढू नये, यासाठी मेळघाटातील टंचाईग्रस्त गावांत पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा तसेच वेळेवर आवश्यक तेवढा पाणीसाठा करणे आवश्यक असल्याचे असोले यांनी सभेत सांगितले. ही बाब लक्षात घेता, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना अधिकाºयांना केली आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी, पस्तलाई, भांदरी, खडीमल, मनभंग, तारूबांदा, सोनापूर आदी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, यासह इतर गावांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या असल्या तरी साथरोगाचा वाढता फैलाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून विशेष बाब म्हणून २० लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी रवींद्र मुंदे यांनी केली.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे अध्यक्ष नितीन गोंडाणे म्हणाले. यावेळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१४ दिवसांनंतर टँकरने पाणी पुरवठा
सोनापूर गावात भीषण पाणीटंचाई असल्याचे पत्र ग्रामपंचायततर्फे १९ एप्रिल रोजी प्रशासनाला पाठविण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी २४ एप्रिल रोजी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात १४ दिवसांनंतर ८ मे रोजी सोनापूर गावात अल्प पुरवठा करणारा टँकर पाठविण्यात आला. तोपर्यंत आदिवासींना नदी-नाल्यांचे गढूळ पाणी द्यावे लागले. त्यातून जलजन्य आजाराची लागण झाली.

सोनापूर येथे एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई आहे. टँकर सुरू करण्यात विलंब झाल्याने गावकऱ्यांना नदी-नाल्याचे गढूळ पाणी प्यावे लागले.
- दिलीप गाठे, ग्रामपंचायत सदस्य, सोनापूर

सोनापूर येथे दूषित पाणी प्यायल्याने अतिसाराची लागण झाली आहे. रुग्णांवर गावातच उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्ण अचलपूरला पाठविले आहेत.
- अमोल गिते, वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंब्रुसोंडा

सोनापूर येथे अतिसाराची लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणा पाठविण्यात आली असून, टँकरसुद्धा सुरू करण्यात आला आहे
- प्रदीप पवार
तहसीलदार, चिखलदरा

Web Title: 66 people with diarrhea infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.