अचलपूर मतदारसंघातील ८३ गावांना मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:58+5:30
अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पावरील या पाणीपुरवठा योजनेला आमदार बच्चू कडू यांनी ३ आॅगस्ट २०१० रोजी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून तत्त्वत: मान्यता मिळविली. मजीप्राच्या मदतीने या प्रस्तावाचे महत्त्व आणि गरजही आमदार कडू यांनी संबंधितांना पटवून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : आठ वर्षांपासून रखडलेली सपन पाणीपुरवठा योजना अखेर आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागली. प्रक ल्पाची निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पावरील या पाणीपुरवठा योजनेला आमदार बच्चू कडू यांनी ३ आॅगस्ट २०१० रोजी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून तत्त्वत: मान्यता मिळविली. मजीप्राच्या मदतीने या प्रस्तावाचे महत्त्व आणि गरजही आमदार कडू यांनी संबंधितांना पटवून दिली. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करीत अखेर आ. कडू यांनी ही योजना मार्गी लावून घेतली. सततच्या पाठपुराव्याने मजीप्राचा पूर्ण व्यवहार्यता अहवाल शासनास सादर झाला. ८३ गावांची ही पाणीपुरवठा योजना संकल्पित करताना २०१८ ते २०२८ आणि २०३८ ची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन ३७ हजार ३२ घरांना नळ जोडणीद्वारे दरमहा ११० रुपये प्रतिघर पाणीपट्टी आकारली जाणार आहे. यात अचलपूर तालुक्यातील ४८ व चांदूर बाजार तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत सपन प्रकल्पातून गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणीपुरवठा होणार आहे. योजना २४ तास कार्यान्वित राहण्याकरिता जलशुद्धीकरण केंद्रांना पूर्णवेळ वीज उपलब्ध राहण्यासाठी एक्स्प्रेस फीडरचीही तरतूद आहे.
अशी आहे योजना
१२ व १६ मीटर उंचीच्या ६४ जलकुंभांतून निघणाऱ्या ३३९.३० किलोमीटर लांबीच्या वितरण व्यवस्थेतून या ८३ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सपन धरणाच्या कालव्यातून गुरुत्व वाहिनीद्वारे पाणी घेण्याकरिता कॅनॉल इनटेक अरेंजमेंट, कनेक्टिंग मेन आणि स्टिलिंग चेंबरमधून पोलादी पाइप टाकले जाणार आहेत. या ८३ गावांकरिता सपन प्रकल्प जलाशयातून संकल्पित लोकसंख्येसाठी ६.९१७ दलघमी वार्षिक पाणी आरक्षणाची गरज आहे. यापैकी ५.७६६ दलघमी वार्षिक पाणी आरक्षणास मंजुरी आहे.