एसटीच्या ७० टक्के बसफेऱ्या झाल्या पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:58+5:302021-07-16T04:10:58+5:30
अमरावती : कोरोनाकाळात एसटीची चाके थांबली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. मात्र, आता अनलॉकमध्ये ६५ ते ७० ...
अमरावती : कोरोनाकाळात एसटीची चाके थांबली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. मात्र, आता अनलॉकमध्ये ६५ ते ७० टक्के बसफेऱ्या पुन्हा सुरू झाल्या असून, त्यातून एसटीला प्रतिदिन २४ लाखांवर उत्पन्न मिळत आहे. मात्र, ज्या मार्गावर एसटीला प्रवासी मिळत नाही, अशा ठिकाणच्या ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंदच असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.
कोरोनाकाळापूर्वी अमरावती जिल्ह्यातून एसटीच्या प्रतिदिन ३५० बसेसच्या २१०० फेऱ्या जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यात राज्यभर व्हायच्या. त्यातून एसटीला प्रतिदिन ३६ ते ३७ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद होत्या. त्यामुळे एसटीचे उत्पन्न फारच कमी झाले होेते. मात्र, आता अनलॉकमध्ये ९६२ फेऱ्या होत आहेत. त्यातून बुधवारी एसटीला मिळालेल्या उत्पन्न २४ लाख ९ हजार एवढे होते. जिल्ह्यात ३७१ एसटी बसेस असून त्यापैकी २५० बसेस रस्त्यावर धावत आहेत. ग्रामीण भागात चांगला रिस्पोन्स मिळाल्यानंतर बससेवा सुरू करण्यात येईल, असे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.
बॉक्स
नागपूर मार्गावर सर्वाधिक बसेस
अमरावती-नागपूर मार्गावर सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यानंतर अमरावती- परतवाडा, अमरावती - अकोट, अमरावती- वरूड, मोर्शी तसेच जिल्ह्याच्या ठिकाणावरून तालुक्याच्या ठिकाणी बसेस जात आहेत. तसेच अकोला, औरंगाबाद, पुणेसाठी बसेस धावत आहेत.
कोट
ज्या मार्गावर जास्त उत्पन्न आहे. तेथे बससेवेला आधी प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागात प्रवासी मिळाल्यानंतर बससेवा पूर्ववत करण्यात येईल. आता ७० टक्के बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक एसटी अमरावती