जिल्ह्यातील ७० टक्के गावांत राजकारण पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:49+5:30
जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य निवडणूक आयोगाद्वारे ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचपदाचे आरक्षणाची तारीख जाहीर झालेली नसल्याने निवडणूक विभागासह इच्छुकांची प्रतीक्षा ताणली आहे.
जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात एक हजार सदस्य, अनुसूचित जमाती प्रवर्गात १२०१, नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये ११७० व सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्य निवडले जातील. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ लोकसंख्या ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारे ही सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाला व ग्रामविकास विभागाला ५ फेब्रुवारीला पाठविण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही सरपंचपदाचे आरक्षण काढण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसल्याने गावागावांत प्रतीक्षा होत आहे.
सरपंचपदाचे निवडीबाबत चर्चेला उधाण
आयोगाने शासन अधिसुचना १३ आॅगस्ट २०१८ चा संदर्भ देऊन थेट जनतेमधून सरपंच निवडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मंगळवारी विधानसभेत ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडीचा प्रस्ताव पारीत केला असल्याने पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याचे मेसेज दिवसभर व्हायरल झाल्याने संभ्रम होता. यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागासी संपर्क साधला असता, याविषयी कुठलेच आदेश नसल्याचे सांगण्यात आले.
शिवरात शेतकरी व्यस्त
गावागावातील निवडणुकीचा कार्यक्रम दीड महिना राहणार आहे. मात्र, याच काळात शिवारांमध्ये हरभऱ्याची सवंगणी व मळणीचा हंगाम राहणार असल्याने शेतकरी व्यस्त राहणार आहे. संपर्क साधताना उमेदवारांची कसरत होणार आहे.